दुपारी पैसे द्या अन् रात्री रेती न्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 00:48 IST2015-12-10T00:48:13+5:302015-12-10T00:48:13+5:30
मागील दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाची कालमर्यादा संपुष्ठात आली.

दुपारी पैसे द्या अन् रात्री रेती न्या !
रेतीमाफियांना अभय : कारवाईच्या नावावर वसुली
संजय साठवणे साकोली
मागील दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाची कालमर्यादा संपुष्ठात आली. मात्र महसूल विभाग कारवाईच्या नावावर पैसे उकळत असल्याचा प्रकार साकोली तालुक्यात उघडकीस आला आहे. महसूल विभागाचा एक अधिकारी दुपारी रेती माफियाकडून पैसे घेऊन रात्री रेतीचे अवैध उत्खनन करण्यासाठी मदत करीत आहे. हा प्रकार साकोलीत बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे.
साकोली तालुक्यातून चुलबंद नदीचे पात्र आहे. या चुलबंद नदीत मोठ्या प्रमाणात रेती आहे. त्यामुळे उमरी, महालगाव, परसोडी या गावातून रेतीघाटातून चांगली रेती निघते.
रेतीघाटाचा लिलाव संपल्यामुळे रेतीला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असून दिवसा ही रेती काढल्या जात नाही. त्यामुळे दिवसा अधिकाऱ्यांशी सेटींग करून रात्री रेतीचे उत्खनन केली जाते. त्यामुळे एक ट्रॅक्टर रात्री आठ ते दहा ट्रीप रेतीचे उत्खणन करतो व सध्या ही रेती प्रती ट्रिप दोन हजार रुपये दराने विकली जात आहे. रेती चोरीवर आळा बसविण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध घातले असून यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
अवैध वसुली
रेती माफियावर नजर ठेवण्यासाठी महसूल विभागातर्फे पथक तयार करण्यात आले. हे पथक दिवसा व रात्री फिरत असते. मात्र रात्री मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करण्यात येत असून रेतीची राजरोसपणे उत्खनन सुरू आहे.
महसुलापेक्षा रेतीच अधिक
नोव्हेंबर महिन्यात महसूल विभागाच्या कार्यवाहीत फक्त १५ प्रकरणांची नोंद असून १ लाख ११ हजार ४०० रुपये गोळा केल्याची नोंद आहे. मात्र अवैध उत्खननाच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. कारण दररोज वीस ते पंचवीस ट्रौक्टर रेतीचे उत्खनन करतात. महिन्याकाठी याचा विचार केल्यास जमा केलेला महसूल नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन यावर आळा बसवावा, अशी मागणी होत आहे.
पथकावर नजर ठेवण्याची गरज
महसूल विभागाने जे पथक तयार केले ते पथक किती वाजता जातात, किती वाजता येतात, कारवाई केली, ज्याची ड्युटी नाही तेही अधिकारी जातात? याची नोंद कार्यालयात असते का? याची चौकशी केल्यास बऱ्याच बाबी उघड होऊ शकतात.
‘त्या’ अधिकाऱ्याला अभय कुणाचे?
साकोली तहसील कार्यालयातील एक अधिकारी स्वत:ला मीच सर्व काही आहे, मी इथे काय समाजसेवा करण्यासाठी आलो का? पैसे कमवायसाठी आलो, असे बोलून वाट्टेल तेवढे पैसे कमावित आहे. याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.