गणित शिक्षक द्या, अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: October 7, 2015 01:53 IST2015-10-07T01:53:18+5:302015-10-07T01:53:18+5:30
नवप्रभात हायस्कूल, कान्हळगाव येथे इयत्ता नववी व दहावी करीता गणित विषयाचा शिक्षक नाही आहे.

गणित शिक्षक द्या, अन्यथा आंदोलन
विद्यार्थी पालकांची मागणी : कान्हळगाव येथील प्रकार
मोहाडी : नवप्रभात हायस्कूल, कान्हळगाव येथे इयत्ता नववी व दहावी करीता गणित विषयाचा शिक्षक नाही आहे. एका आठवड्यात शिक्षकाची पूर्तता करण्यात आली नाही तर शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी, पालकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन संस्था सचिव, अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक, नागपूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, भंडारा व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना देण्यात आले आहेत.
नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव येथे सत्राच्या सुरूवातीपासून इयत्ता नववी व दहावीला गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. मागील दोन वर्षीही गणिताचा शिक्षक देण्यात आला नव्हता. शाळा स्तरावर बीएससी नापास असलेल्या एका व्यक्तीची तासिका नुसार गणित विषय शिकविण्याकरीता व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नवप्रभात शिक्षण संस्था सचिव अध्यक्ष यांनी गणित विषयाचा शिक्षक पुरविला नाही. मागील शैक्षणिक समात काही महिने पाठक नामक गणिताच्या शिक्षिका आल्या होत्या.
पण त्यांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली. त्यांना वरठी येथे पाठविण्यात पदोन्नतीवर पाठविण्यात आले. आता शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून गणित विषय शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाही आहे. उलट एकाच शाळेत दोन विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत. एकाच विज्ञान शिक्षकाची गरज असताना संस्थेने पुन्हा एक शिक्षिकेला नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव येथे पाठविले. मात्र अर्धा शैक्षणिक सत्र संपण्याच्या वाटेवर आला असतानाही संस्थेने गणिताचा शिक्षक दिला नाही. नवप्रभात शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. भंडारा यांना एका गणित शिक्षकाची बदली करण्याची परवानगी मागितली असल्याचे समजते. अजुनही शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही. नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव येथे दि. १४ आॅक्टोबरपर्यंत गणित विषयाचा शिक्षक देण्यात आला नाही तर शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी व पालकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)