सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी द्या
By Admin | Updated: March 16, 2016 08:34 IST2016-03-16T08:34:35+5:302016-03-16T08:34:35+5:30
जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या वारस व वारसांना नोकरी देण्यात यावी असे स्पष्ट आदेश असतानाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे.

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी द्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सामाजिक संघटनेची मागणी
भंडारा : जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या वारस व वारसांना नोकरी देण्यात यावी असे स्पष्ट आदेश असतानाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे. संबंधित वारसांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सम्राट सामाजिक संघटनेचे सदस्य विष्णूदास लोणारे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजया बनकर यांना देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत १० नोव्हेंबर २०१५ च्या आदेशात लाड व पागे समितीने सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी वाल्मीकी, मेहतर समाजातील वारस व वारसा पद्धतीने ३० दिवसांच्या आत नोकरीवर घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाप्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अजूनपर्यंत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यात आली नाही. सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ नोकरी देण्यात यावी, अन्यथा २१ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विजया बनकर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रशांत रामटेके, विष्णूदास लोणारे, कन्हैय्या नागपुरे, सतीष निंबार्ते, त्रिवेणी वासनिक, कविता लोणारे, संदीप निंबार्ते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)