अन्यायाच्या विरोधात मुलींनी समोर येण्याचे धाडस दाखवावे
By Admin | Updated: March 2, 2017 00:21 IST2017-03-02T00:21:22+5:302017-03-02T00:21:22+5:30
ब्रिटीश कायदे आजही अस्तित्वात असले तरी, निर्भया प्रकारणानंतर कायद्यात सकारात्मक बदल होऊ लागलेत. आपल्याकडे सक्षम कायदे आहेत.

अन्यायाच्या विरोधात मुलींनी समोर येण्याचे धाडस दाखवावे
स्मिता मेश्राम यांचे आवाहन : महिला जागृती कार्यशाळा
साकोली : ब्रिटीश कायदे आजही अस्तित्वात असले तरी, निर्भया प्रकारणानंतर कायद्यात सकारात्मक बदल होऊ लागलेत. आपल्याकडे सक्षम कायदे आहेत. शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, ही म्हण कालबाह्य झाली असून अन्याय झाल्यानंतर न्याय मिळविण्यासाठी कोर्टात जायलाच पाहिजे. याकरिता मुलींनी अन्यायाच्या विरोधात समोर येण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन शासकीय अधिवक्ता अॅड. स्मिता मेश्राम यांनी केले.
वैनगंगा बहुउद्देशिय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी येथे महिला कार्यशाळेच्या अध्यक्षीय पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
पीयूएसएच महाराष्ट्र राज्य महिला मुंबई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सदर महिला जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी अॅड. स्मिता मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून ताराचंद निखाडे अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या निता टेंभरे, संस्था सदस्य देवचंद करंजेकर, प्रभारी आतिश शहारे, अविनाश मस्के उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन अॅड. मेश्राम यांनी अनेक अन्यायाचे दाखले देऊन कायद्यातील कलमांचा आयपीसी उलगडा केला. प्रत्येक ठिकाणी महिला तक्रार निवारण केंद्र असल्याचा त्यांनी मार्गदर्शन करताना आवर्जून उल्लेख केला. यावेळी इतरही पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक सेविका सूचिता आगाशे तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर चकोले, तृषाली गभणे, रूपाली कापगते उपस्थित होत्या.
याप्रसंगी पोस्टर्स आणि काव्य स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या श्वेता जवंजाळ, निकिता चौधरी, ज्योत्सना देशमुख, अपर्णा रोकडे या विद्यार्थीनींना बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रदान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आतिष शहारे, संचालन फरीन शेख आभार प्रदर्शन हर्षल शेंडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.फार्म चतूर्थ वर्षातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)