मुलगी आजही ‘नकोशी’च
By Admin | Updated: March 8, 2015 00:24 IST2015-03-08T00:24:29+5:302015-03-08T00:24:29+5:30
‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानावर शासनाने मोठा गाजावाजा केला आहे. याउपरांतही जिल्ह्यातील लिंगदरात तफावत जाणवत आहे.

मुलगी आजही ‘नकोशी’च
प्रशांत देसाई भंडारा
‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानावर शासनाने मोठा गाजावाजा केला आहे. याउपरांतही जिल्ह्यातील लिंगदरात तफावत जाणवत आहे. गत दहा महिन्यात ग्रामीण व शहरी भागात ८,५६० मुलांनी तर ७,८६८ मुलींनी जन्म घेतला आहे. मुलींच्या जन्मदरावरून आधुनिक काळातही अनेकांना मुलगी 'नकोशी' असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. मागील दहा महिन्यात मुलांच्या तुलनेत ६९२ मुलींची तफावत आहे.
मुलगा-मुलगी जन्माला येणे ही नैसर्गिक क्रीया आहे. तरीसुध्दा मुलाच्या हव्यासापायी सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केल्या जातो. आणि मुलीचा गर्भ असेल तर तो पाडला जातो. काही प्रमाणात अवैध गर्भपात गर्भलिंग चाचणी झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळेच कदाचित मुलींच्या संख्येत घट होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
पुर्वीच्या काळी महिलेला फक्त 'चूल आणि मूल' हीच जबाबदारी होती. पुरूषप्रधान संस्कृतीच्या पगड्यात महिलांना दुय्यम स्थान होत.
मात्र, आता परिस्थिती पालटत आहे. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी नाव कोरले आहे. सामाजिक क्षेत्र असो वा राजकीय क्षेत्र प्रत्येकात महिलांनी केलेली प्रगती वाखान्याजोगी आहे. अशाही स्थितीत मुलींच्या जन्माबाबत उदासिनता दिसून येते. एकीकडे महिलांची उत्तोरोत्तर प्रगती होत असताना मुलींना गर्भातच मारण्याचे पाप वाढत आहेत.
यावर आळा बसविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी, भू्रणहत्या मात्र, थांबलेल्या नाहित. कायद्याने गर्भधारणेआधी आणि प्रसूतीआधी गर्भलिंग निदान करण्यावर बंदी आहे. पण, जोपर्यंत अशा तक्रारी घेऊन लोक पुढे येत नाहीत, तोपर्यंत त्याची अंमलबजावणी करणं अवघड आहे.