आहाराव्दारे मिळवा तणावापासून मुक्ती
By Admin | Updated: November 9, 2014 22:28 IST2014-11-09T22:28:30+5:302014-11-09T22:28:30+5:30
तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत.

आहाराव्दारे मिळवा तणावापासून मुक्ती
भंडारा : तणाव ही एकविसाव्या शतकाने दिलेली देण आहे. सध्याचा काळ तणावाचा असल्याचे म्हटले जात आहे; पण त्यासोबत तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल यासाठीही उपाय शोधले जात आहेत. योग, ध्यानधारणा, सकारात्मक विचार, व्यायाम, मसाज, अरोमाथेरपी, म्युझिक थेरपी असे तणावावरचे अनेक उपाय आपण शोधून काढले आहेत. आता आहाराच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही संशोधकांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. विशिष्ट आहाराने तणावाचा सामना करता येईल, असे या संशोधकांचे मत आहे. माणसाला जेव्हा तणाव येतो, तेव्हा त्याला थकवा येतो. शरीर गळल्यासारखे वाटते. हा थकवा घालविण्यासाठी चहा, कॉफीचा पर्याय निवडला जातो. या पेयांमुळे तात्पुरती चेतना मिळते; पण तणावामुळे शरीराचे झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यापेक्षा काही अन्नपदार्थांमुळे उत्तेजक पेयांपेक्षा वेगळा आणि कायमचा सकारात्मक परिणाम होतो. तणावात असताना माणसाच्या शरीराचीही काही प्रमाणात झीज होते. त्यामुळे शरीरात साठवलेल्या काही पोषक तत्त्वांचाही ऱ्हास होतो.
विशेषत: प्रथिने आणि अ, ब, क ही जीवनसत्वे नष्ट होतात. ज्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, ते तणावाचा परिणामकारकपणे सामना करू शकतात. परंतु ज्याच्या शरीरामध्ये मुळातच ही द्रव्ये कमी असतात ते लोक तणावाचा तेवढा परिणामकारकपणे सामना करू शकत नाहीत. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाले तर असे म्हणता येईल की, जे लोक अशक्त असतात, त्यांना तणाव जास्त सहन होत नाही आणि जे सशक्त असतात, त्यांच्याकडे तणाव सहन करण्याची ताकद असते. तणावाचा सामना करण्यासाठी केळी हे उत्तम पर्याय आहे. केळीमध्ये विशिष्ट प्रकारची प्रथिने असतात. ती प्रथिने शरीरातील काही प्रक्रियांमधून सेरोटोनिनमध्ये परिवर्तीत होतात आणि हे सेरोटोनिन आपल्याला तणावाच्या काळात दिलासा देते. आपली मन:स्थिती बदलण्यास मदत करते आणि आपल्याला आनंदी बनवते. केळी खाल्ल्याने वजन वाढते हे खरे आहे; परंतु ज्यांना अजून लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली नसेल त्यांनी अधूनमधून केळी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय सहज उपलब्ध असणारे तणावावरचे दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबतातील क जीवनसत्व आपल्याला तणावापासून दिलासा मिळवून देते. (शहर प्रतिनिधी)