दृकश्राव्य जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घ्या
By Admin | Updated: June 26, 2015 00:52 IST2015-06-26T00:52:34+5:302015-06-26T00:52:34+5:30
राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना दुरचित्रवाणी वाहिनी, स्थानिक केबल नेटवर्क, आकाशवाणी, एफएम, चित्रपटगृहे, सोशल मिडिया तसेच ...

दृकश्राव्य जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घ्या
उमेदवारांसाठी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
भंडारा : राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना दुरचित्रवाणी वाहिनी, स्थानिक केबल नेटवर्क, आकाशवाणी, एफएम, चित्रपटगृहे, सोशल मिडिया तसेच सार्वजनिक ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ दृकश्राव्य जाहिरात प्रसारित करण्यासाठी पूर्व-प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करुन पुर्व-प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय राजकीय पक्ष, उमेदवार यांनी दृकश्राव्य जाहिरात प्रत्यक्ष प्रसारणाच्या तीन दिवस आधी पूर्व-प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्ष, उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी जाहिरात प्रसारणाच्या सात दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे.
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील राजकीय पक्ष, उमेदवारांनी त्या-त्या क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाहिरातीच्या पुर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)