सामान्य रूग्णालयातील रूग्णसेवा ढासळली
By Admin | Updated: April 29, 2015 00:33 IST2015-04-29T00:33:51+5:302015-04-29T00:33:51+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयाला जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाते.

सामान्य रूग्णालयातील रूग्णसेवा ढासळली
भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयाला जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाते. मोफत उपचार होत असल्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिक येथे उपचारासाठी आशेने दाखल होतात. परंतु येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असुविधेने कळस गाठला असून औषधोपचाराअभावी रूग्णांनी येथून पळ काढावा लागत आहे.
सोमवारी सायंकाळी लाखनी तालुक्यात झालेल्या अपघातातील रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल १२ तासानंतरही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना रूग्णालयातच विव्हळत पडून राहावे लागले आहे. यातील काहींनी असुविधेचा धसका घेऊन खासगी रूग्णालयात जाणे पसंत केले. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका रूग्णावर मागील दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. एका रूग्णाला तर शस्त्रक्रिया कक्षातून वॉर्डात आणि वॉर्डातून शस्त्रक्रिया कक्षात अशा फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याला डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेसाठी केवळ ’तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे.
सोमवारला सायंकाळी लाखनी तालुक्यातील चिखलाबोडी येथून मोहघाटाकडे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालया दाखल करण्यात आले होते. तब्बल १२ तासानंतरही त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले नाही. या सर्व जखमींवर लाखनी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याच उपचारावर त्यांनी भंडारा येथील रूग्णालयात रात्र काढली. मंगळवारला या जखमींच्या नातेवाईकांमध्ये रुग्णालयाप्रति असंतोष दिसून आला. याबाबत सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, वास्तवस्थिती दिसून आली.
या अपघातातील १५ वर्षीय कमलेश मारोती नामुर्ते रा.देऊळगांव याला वॉर्ड क्रमांक १५ मध्ये दाखल केले आहे. त्याच्या पाठीला गंभीर इजा झालेली आहे. पाठीला जखम असल्याने हा बालक वेदनेने विव्हळत आहे. वॉर्ड क्रमांक १४ मध्ये दाखल असलेल्या संदीप लांजेवार (३०) रा.मोहघाटा याच्यावर लाखनीत जे उपचार करण्यात आले त्यावरच तो जखमी अवस्थेत आहे. त्याच्या हाताला व तोंडाच्या जबड्याला इजा झाली असतानाही औषधोपचारासाठी डॉक्टर किंवा परिचारिका तिथे आली नसल्याचे जखमी संदीपने सांगितले.
वॉर्ड क्रमांक १८ मध्ये दाखल असलेल्या पुष्पा शिशुपाल कोवे (३०) रा. बोरगाव, अल्का क्रिष्णा उईके (३२) रा. रेंगेपार, प्रज्ञा सुखराम कुंभरे (१६) रा. मुरपार, सत्यभामा ईसन मडावी (५०) रा. मोहघाटा, वैशाली पतिराम मडावी (४५) रा. गिरोला यांच्यासह अन्य महिलांवरही औषधोपचाराची तीच परिस्थिती आहे. अपघातानंतर त्यांच्यावर लाखनी रूग्णालयात जे औषधोपचार करण्यात आले ते शेवटचे उपचार ठरले. (शहर प्रतिनिधी)
शस्त्रक्रियेसाठी तारीख पे तारीख
अस्थीरुग्ण विभागाच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये मेहर नामक व्यक्ती मागील दोन महिन्यापासून शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला आहे. मात्र, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नसल्याने तो जीवाच्या आकांताने विव्हळत आहे. अशास्थितीत डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत नाही किंवा त्याच्या नातेवाईकाला योग्य सल्ला देणेही औचित्याचे समजत नाही. याच वॉर्डात दाखल असलेला धारगाव येथील आशिष भोजराज साखरे (३७) याचा अपघात झाल्याने गुडघ्याला दुखापत झालेली आहे. मागील काही दिवसापासून त्याला भरती करण्यात आलेले आहे. परंतु, त्याला शस्त्रक्रियेसाठी तारीख दिल्यानंतर शस्त्रक्रिया गृहात नेण्यात येते व परत वॉर्डात पाठविल्या जात आहे. त्याला शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात अनेकदा ‘तारीख पे तारीख’ देण्यात आलेली आहे. सोमवारला त्याला शस्त्रक्रियेसाठी सकाळी ९.३० वाजता नेण्यात आले. दुपारी १.३० वाजेपर्यंत शस्त्रक्रियेबिना ठेवण्यात आले. अशावेळी डॉक्टरांनी त्याला ढुंकूनही बघीतले नाही, त्यामुळे वॉर्ड बॉयच्या मदतीने त्याला परत वॉर्डात पाठविण्यात आल्याची प्रतिक्रया संदीपने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.