आयुध निर्माणीचे महाप्रबंधक पोलीस चौकशीसाठी अनुपस्थित
By Admin | Updated: December 22, 2016 00:45 IST2016-12-22T00:45:26+5:302016-12-22T00:45:26+5:30
भंडारा आयुध निर्माणी येथील स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असताना तीन ट्रक चालकांकडे स्फोटक पदार्थाच्या वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी त्यांना पकडले.

आयुध निर्माणीचे महाप्रबंधक पोलीस चौकशीसाठी अनुपस्थित
विनापरवाना स्फोटक वाहतूक : जवाहरनगर येथे गुन्हा दाखल
जवाहरनगर : भंडारा आयुध निर्माणी येथील स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असताना तीन ट्रक चालकांकडे स्फोटक पदार्थाच्या वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी त्यांना पकडले. याप्रकरणी तीन ट्रकचालक, एम.टी.सेक्शनप्रमुख व स्फोटक वाहन सुरक्षारक्षक चौकशीला सामोरे गेले. मात्र महाप्रबंधक चौकशीसाठी पळवाटा शोधत असून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आले नाही.
पोलीस सूत्रानुसार, भंडारा आयुध निर्माणी येथील स्फोटक पदार्थाची वाहतूक करीत असताना ट्रक क्र. एम.एच. ३६ के १३२, एम.एच. ३६ के १३३ व एम.एच. ३६ के १६५ या ट्रकचालकांला चौकशीदरम्यान स्फोटक पदार्थ वाहतुकीला परवाना नसताना १९ डिसेंबर रोजी अडविण्यात आले. चौकशीसाठी तिन्ही ट्रक चालक एम.टी. सेक्शन प्रमुख, स्फोटक वाहन सुरक्षा रक्षक, महाप्रबंधकांना १६० कलमान्वये जवाहरनगर पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यातील चालक, सेक्शनप्रमुख,स्फोटक वाहन सुरक्षारक्षक पोलीस ठाण्यात चौकशीकरिता हजर झाले. मात्र महाप्रबंधक ई.आर. शेख हे २१ डिसेंबर उपस्थित झाले नाही. याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागलेले आहे. वसाहतीबाहेरील रिंग रोडने गेट क्रमांक ३ वरून स्फोटक पदार्थ वाहतूक करणारे ट्रक बाहेर पडतात. लगेच पोलीस ठाण्यासमोर वाहन परीक्षण दस्ताऐवज पूर्ण झाल्यावर पुढील गंतव्य स्थानाकडे रवाना होत असतात. मात्र यावेळी गेट क्रमांक ३ वरून बाहेर न पडता सर्व तिन्ही ट्रक पोलीस ठाणे वगळून गेट क्रमांक १० वरून तेही घनदाट वसाहतीमधून स्फोटक पदार्थ असलेले ट्रक बाहेर कसे निघाले हा चर्चेचा विषय झाला आहे. साहुली गेट बंद करणे, ओव्हरटाईम बंद करणे, महाप्रबंधक संघटना, कर्मचारी व व्हीजीटर यांच्या सुसंवादाचा अभाव, परिणामी संबंधित वरिष्ठ सुरक्षा विभाग महाप्रबंधकावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. (वार्ताहर)