सामान्य नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू
By Admin | Updated: November 1, 2015 00:46 IST2015-11-01T00:46:59+5:302015-11-01T00:46:59+5:30
मागील वर्षभरात राज्य सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि तळागाळातील जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वर्षभरात अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

सामान्य नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू
राज्य सरकारची वर्षपूर्ती : आमदारांचा पत्रपरिषदेत आशावाद
भंडारा : मागील वर्षभरात राज्य सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि तळागाळातील जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वर्षभरात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. सरकारने महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, उद्योजक, अल्पसंख्यांक अशा विविध घटकांसाठी काम केले. पहिल्याच वर्षात सर्वसामान्यांपर्यंत कायम नाळ जुळून राहिलेले भाजप सरकार यापुढेही सामान्यांसाठीच काम करणार असल्याचा विश्वास तुमसरचे आमदार चरण वाघमारे, साकोलीचे आमदार राजेश काशीवार, भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या आमदारद्वयींनी स्थानिक विश्रामगृहात संयुक्त पत्रपरिषद घेऊन वर्षभरातील कामांचा आढावा सांगितला. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, राज्य सरकारने वर्षभरात जलयुक्त शिवार अभियान राबवून लाखो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा करून दिली. पहिल्याच वर्षात राज्यातील साडे सहा हजार गावामध्ये ही योजना राबवून या योजनेतून गावे दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. ही योजना भंडारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
आमदार काशीवार म्हणाले, राज्य सरकारने सावकारी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगून भंडारा जिल्ह्यातील ९९४ शेतकऱ्यांचे १.५४ कोटी रुपये माफ केले. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे आ.काशीवार यांनी सांगितले.
आ.काशीवार म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कधी नव्हे ते पहिल्यांदा राज्य सरकारने २५० रुपयांचा बोनस जाहीर केला. आतापर्यंतच्या सरकारच्या काळात केंद्र शासन धानाला बोनस देत होते. यावर्षीपासून राज्य सरकारने धानाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांची मत्स्यबिजे वाहून गेली होती अशा मासेमार बांधवांना २.१६ कोटींची मदत राज्य शासनाने दिल्याचे आमदार काशीवार यांनी सांगितले.
आ.अवसरे म्हणाले, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जाती पडताळणी समिती स्थापण्याचा निर्णय सरकारने घेतला. लोकसहभागावर आधारित वन्यजीवांचा विकास साधण्यासाठी जन वन योजना आखण्यात आली. व्याघ्र वन व वन्यजीव संरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला डॉ.प्रकाश मालगावे, तारीक कुरेशी, प्रदीप पडोळे, विकास मदनकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)