पाण्यावरून गाजली जिल्हा परिषदेची सभा
By Admin | Updated: March 24, 2016 01:17 IST2016-03-24T01:17:51+5:302016-03-24T01:17:51+5:30
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी एक छदामही

पाण्यावरून गाजली जिल्हा परिषदेची सभा
भंडारा : जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी एक छदामही राखून ठेवली नाही. यावर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला. अखेरीस पाणीपुरवठा विभागासाठी १ कोटी २० लाख रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन सभागृहात देण्यात आले.
सोमवारी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा पाण्याच्या विषयासह विविध मुद्दयांवर गाजली. ही सभा रात्री ९ वाजतापर्यत सुरू होती. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी विशेष निधीची तरतूद केली जाते. पाणीपुरवठा योजना, कर्मचाऱ्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधीसाठी ही तरतूद असते. परंतु, या अर्थसंकल्पात एकही तरतूद करण्यात आली नाही. याशिवाय शहापूर, गोबरवाही आदी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाणीपट्टी कर एक हजार २०० रुपयांवरून थेट एक हजार ८०० रुपये करण्यात आल्याने विरोधी सदस्यांनी आक्षेप घेत ही करवाढ मागे घेण्याची मागणी केली. या करवाढीचा भुर्दंड नळधारकांना बसणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत हातपंपाची दुरुस्ती, प्रादेशिक नळ योजनेतील वीज पंपाची देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी निधीची तरतूद असताना यावेळी निधीच देण्यात आला नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)
अर्थसंकल्पात त्रुट्या
४सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक त्रुट्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर्षी सुमारे पाच कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यात ग्रामीण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणीपट्टी कर वाढविण्याची काहीच गरज नसताना ती ६०० रुपयांनी वाढविण्यात आली. भाजपचे सदस्य संदीप ताले, अरविंद भालाधरे, सुभाष आजबले यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे.