दारूने भरलेला ट्रक पळविणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:19 IST2017-11-15T00:19:09+5:302017-11-15T00:19:23+5:30
पवनी तालुक्यातील भावड येथील देशी दारूच्या दुकानासमोरून दारू भरलेला ट्रक आरोपींनी पळवून नेला. ही घटना शनिवारी घडली.

दारूने भरलेला ट्रक पळविणारे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पवनी तालुक्यातील भावड येथील देशी दारूच्या दुकानासमोरून दारू भरलेला ट्रक आरोपींनी पळवून नेला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी ट्रक पळवून नेणाºया सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २० लाख १२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुभम रामटेके (२३) रा.लाखांदूर, संदीप रायपुरे (२९) रा.ब्रम्हपुरी, दुर्गेश भसाखेत्रे (२८) रा.ब्रम्हपुरी, व्यंकटेश ताडपल्लीवार (३२) रा.गडचिरोली, शफ्फू पठान (१८) रा.गडचिरोली, रफिकखान वहिद खान (२७) रा.नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. साकोली येथून एमएच ३५ के ११०७ या ट्रकमध्ये देशी दारूच्या ७२५ पेट्या भरून हा दारूसाठा भावड येथील देशी दारू दुकानदाराला पुरवठा करण्यात आला. मात्र सदर ट्रक रात्री उशिरा पोहचल्याने दुकान बंद झाले होते. त्यामुळे दारूसाठा भरलेल्या ट्रकसह मजूर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून झोपले होते.
दरम्यान एका वाहनाने आलेले आठ इसम तिथे येऊन ट्रक चालकाला धमकावत चाव्या हिसकावून ट्रक घेऊन पळाले. याची तक्रार अड्याळ व पवनी पोलिसांना करण्यात आली. पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच ते ट्रक सोडून पळाले. यात शुभम रामटेके (२३) रा.लाखांदूर हा सापडला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने शुभमने दिलेल्या माहितीवरून सापळा रचून उर्वरित आरोपींना अटक केली. या आरोपींकडून २० लाख १२ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मुख्य आरोपीसह अन्य काही आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस सुरू आहे.