गॅस सिलिंडरधारकांची पिळवणूक
By Admin | Updated: March 20, 2015 00:33 IST2015-03-20T00:33:31+5:302015-03-20T00:33:31+5:30
येथे गॅस एजंसीतर्फे भारत गॅस कंपनीचे सिलिंडर वाटप करण्यात येते. मागील काही दिवसांपासून सिलिंडर ‘स्टॉक’ नसल्याने येथील नागरिक गॅस एजंसीसमोर दररोज सिलिंडरची रांग लावतात ...

गॅस सिलिंडरधारकांची पिळवणूक
मोहाडी : येथे गॅस एजंसीतर्फे भारत गॅस कंपनीचे सिलिंडर वाटप करण्यात येते. मागील काही दिवसांपासून सिलिंडर ‘स्टॉक’ नसल्याने येथील नागरिक गॅस एजंसीसमोर दररोज सिलिंडरची रांग लावतात व सायंकाळी सिलिंडर परत नेतात. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एजंसीतर्फे ‘नो स्टॉक’चा बोर्ड लावल्यास नागरिकांचा त्रास वाचेल अशी जनभावना आहे.
मोहाडी हे तहसिलचे ठिकाण असून सुध्दा येथे एकही गॅस कंपनीची एजेंसी देण्यात आलेली नाही. भारत गॅस कंपनीतर्फे वरठी (भंडारा रोड) येथील एका गॅस एजंसीला काम देण्यात आले आहे. या गॅस एजंसीतर्फे मोहाडीतील नागरिकांना गॅस कनेक्शन देण्यात आले.
येथील बाजारातील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स मधील एक खोली गॅस एजंसीतर्फे भाड्याने घेण्यात आली व तिथे आॅफीस सुरु करण्यात आले. एक दिवसाआड येथुन सिलेंडरचे वाटप करण्यात येते. मागणी जास्त व सिलिंडरचा पुरवठा कमी यामुळे येथे नेहमी सिलिंडरच्या रांगाच रांगा लावाव्या लागतात. मात्र ज्या दिवशी मोहाडी येथे सिलिंडरची गाडी पाठविण्यात येणार नसेल त्या दिवशी ‘आज गाडी येणार नाही’ असे नोटीस बोर्डावर लिहिण्यात आले तर येथील नागरिक त्या दिवशी सिलिंडर एजेंसीसमोर रांगेत लावणार नाहीत. त्यांचा त्रास होणार नाही, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. दुपारी २ वाजतापासुन सायंकाळपर्यंत नागरीक सिलिंडरजवळ उभे राहत असल्याने त्यांना त्रास होतो. (शहर प्रतिनिधी)