गारवा वाढला; थंडी परतली
By Admin | Updated: January 21, 2016 00:51 IST2016-01-21T00:51:08+5:302016-01-21T00:51:08+5:30
दोन दिवसांपासून थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी पळाल्याचे जाणवत होते.

गारवा वाढला; थंडी परतली
शेकोट्या पेटल्या : भंडाऱ्यात पारा १४ अंशावर
भंडारा : दोन दिवसांपासून थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी पळाल्याचे जाणवत होते. मात्र दोन दिवसांपासून थंडीने पुन्हा डोके वर काढल्याने शेकट्या पेटू लागल्या असून उबदार कपडे खरेदीसाठी नागरीकांची गर्दी वाढू लागली आहे. आज पारा १४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
विदर्भातील वातावरणात थंड वारे वाहू लागले असून, मध्यभारतातील तापमान घसरत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात तापमान पुन्हा ४ ते ५ अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या सर्वत्र कमाल तापमान २७ डिग्रीपेक्षा अधिक तर किमान तापमान १४.५ अंशापर्यंत आहे. उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम हळूहळू जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात अचानक घट झाली आहे. थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी कपाटात ठेवलेले ऊबदार कपडे बाहेर काढले आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्यातून शरीराला ऊब देण्याचा प्रकार शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. दिवसाच्या तापमान मोठ्या प्रमाणात घसरले. यावर्षी जानेवारीच्या तापमानातील ही सर्वात मोठी घट आहे. यामुळे दिवसभर नागरिक उबदार कपडे घालून वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चहा टपरीमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली. थंडीच्या लाटेचा फायदा रबी पिकांना होणार आहे. ही लाट किती दिवस कायम राहते, यावर रबीच्या पिकांचे उत्पादन अवलंबून राहणार आहे. वाढलेल्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानामध्ये उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. (नगर प्रतिनिधी)
आजार बळावले, रुग्णालये फुल्ल
अकाली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वातावरण बदलामुळे विविध आजार बळावले असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहेत. शहरातील रुग्णालय, दवाखाण्यांमध्ये रुग्णांर्ची गर्दी दिसून आली. जिल्ह्यात १५ दिवसांपासून वातावरण कोरडे होते. मागील दोन दिवसांत रिमझिम पावासाने हजेरी लावली. तर आज दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरु होता. वातावरण बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा वाढता प्रभाव बालक व वृद्धासाठी जीवघेणाही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या थंडीमुळे बालक व वृद्धांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.