पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर टाकला कचरा
By Admin | Updated: March 5, 2016 00:33 IST2016-03-05T00:33:22+5:302016-03-05T00:33:22+5:30
घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले असताना त्यात आजच्या नगरसेवकाच्या कृतीने पुन्हा एकदा या बाबीतला रोष समोर आला.

पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर टाकला कचरा
नगरपालिकेतील प्रकार : घनकचरा व्यवस्थापन फज्जेचा रोष, नगरसेवकाचा प्रताप
भंडारा : घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले असताना त्यात आजच्या नगरसेवकाच्या कृतीने पुन्हा एकदा या बाबीतला रोष समोर आला. भाजपचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी आज गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर घरातील कचरा आणून टाकला. अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे कर्मचारी व अन्य कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.वारंवार सांगुनही घनकचरा व्यवस्थापनेकडे दुर्लक्ष केल्याने नगर पालिका प्रशासनाचा निषेध व ध्यानाकर्षण करण्यासाठी हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले.
साफसफाई, जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण भंडारा शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात भंडारा शहर हरवून गेले की काय? असे वाटत आहे.
मागील महिन्यात शहराच्या मुख्य मागाचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी रस्त्याच्या कडेला कचराच कचरा दिसून येतो. हे दृश्य शहराच्या विद्रुपतेत भर घालत आहे. अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी प्रसिद्ध असल्याचे जाणवते. सामाजिक संघटनांच्या माध्यामातून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी नागरिकांचे सहकार्य अत्यल्प आहे.
स्वच्छता केली तर दुसऱ्या दिवशी स्वच्छ केलेला परिसर पुन्हा कचऱ्याने माखू लागतो. रस्त्यांवर कचराच कचरा दिसून येतो. जिल्हाधिकारी चौकापासून ते शास्त्रीनगर चौकापर्यंत आणि महात्मा गांधी चौकापासून तर जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यांवर कचरा हमखास दिसून येते.
दरम्यान घनकचरा व्यवस्थापनेच्या बाबीला हेरून नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी आज नगरपालिकेत मुख्याकिाऱ्यांच्या दालनासमोरच घरातील कचरा आणून फेकला. कचऱ्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये दुर्गंधी पसरली.
नगर पालिकेचा स्वच्छता विभाग घनकचरा व्यवस्थापनेकडे गांर्भियाने लक्ष देत नाही, असा आरोप करित निंबार्ते यांनी नगर पालिकेच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला. गुणवत्तेचा प्रश्न विचारात न घेतलेला बरा. त्यातही नालीच्या समस्याने घनकचरा व्यवस्थापनेचे तिनतेरा वाजले आहेत. (प्रतिनिधी)