मॉडेल म्हणून विकसित होणार ‘गणपती तलाव’
By Admin | Updated: April 24, 2015 00:29 IST2015-04-24T00:29:00+5:302015-04-24T00:29:00+5:30
जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. लोकसहभाग व शासन निधीतून तलावांचा विकास व खोलीकरण

मॉडेल म्हणून विकसित होणार ‘गणपती तलाव’
युवराज गोमासे करडी
जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. लोकसहभाग व शासन निधीतून तलावांचा विकास व खोलीकरण आणि सिंचन क्षमता वाढविण्याचा लक्षांक या योजनेत ठरविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर मॉडेल तलाव म्हणून विकसीत करण्यासाठी शासन प्रशासनाने करडी येथील गणपती तलावाची निवड केली आहे. मॉडेल म्हणून विकसीत होणारे तालुक्यातील ते एकमेव तलाव ठरणार आहे.
या योजनेसाठी करडी, मोहगाव, बोरी, देव्हाडा बु., नरसिंगटोला, बच्छेरा (वासेरा), उसर्रा, टांगा, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवणी, खैरलांजी आदी गावांची निवड शासन प्रशासन स्तरावरून करण्यात आली आहे. तलावांचा सिंचनासाठी फारसा उपयोग होत नाही. तसा मनुष्य व जनावरांनाही फायदा होत नाही. तलावांच्या क्षेत्रात अतिक्रमणे वाढल्याने सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठवून ठेवता येत नाही. जिल्ह्यात ३०० वर्षे जुनी सुमारे ११५४ तलाव असली तरी सर्वांची परिस्थिती थोडीफार सारखीच आहे. प्रायोगिक तत्वावर विकसित होणाऱ्या गणपती तलावाची जि.प. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एच. गुप्ता यांनी पाहणी केली. यावेळी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, सरपंच सीमा साठवणे, ग्रामसेवक युवराज कुथे, अभियंता संजय चाचिरे, महादेव बुरडे, सीयाराम साठवणे, माजी सदस्य दिलीप तितीरमारे, भास्कर गाढवे, मंगेश साठवणे, मंगेश धोटे उपस्थित होते.