गंगेकडे लक्ष, वैनगंगेकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 1, 2014 22:48 IST2014-11-01T22:48:04+5:302014-11-01T22:48:04+5:30
तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील चार ते पाच गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याची भिती बळावली आहे. आतापर्यंत नदीकाठावरील ४८ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे.

गंगेकडे लक्ष, वैनगंगेकडे दुर्लक्ष
तुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील चार ते पाच गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याची भिती बळावली आहे. आतापर्यंत नदीकाठावरील ४८ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. तत्कालीन कृषीमंत्र्यांनी नदीकाठावर भेट देऊन पाहणी केली. परंतु पुढे काही झाले नाही. एकीकडे नदी बचाव आणि स्वच्छतेसाठी केंद्राने पुढाकार घेतला असताना इकडे मात्र वैनगंगा नदीची फरफट सुरू आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नदीचा प्रवास हा ४० ते ४५ कि.मी. इतका आहे. तालुक्यात लहान मोठे सहा नदीघाटांचे रेती लिलाव महसूल प्रशासन मागील अनेक वर्षापासून करीत आहेत. नियमबाह्य तथा अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने रेतीचा प्रचंड उपसा नदीपात्रात सातत्याने सुरु आहे. पर्यावरणतज्ज्ञ व स्थापत्य अभियंत्यांच्या निरीक्षणात प्रचंड रेती उपसाच नदीचा प्रवाह पात्र बदलते असे सांगत आहेत. तुमसर तालुक्यातील उमरवाडा, बोरी, कोष्टी, रेंगेपार व इतर नदीकाठावरील गावातील सुमारे ४८ हेक्टर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे.
उमरवाडा नदीपात्रात तर नदीपात्राच्या मधोमध मोठा खड्डाच पडला आहे. येथून रेतीचा उपसा किती झाला असेल ते दिसते. अशा मानवनिर्मित खड्यामुळे उमरवाडा येथील डोंगा उलटून डझनभर नागरिकांचा जीव एका वर्षापूर्वी गेला होता. सध्या नदीपात्रात रेती ऐवजी माती दिसत आहे. बाम्हणी येथे नदीघाटात माती व केवळ लहान दगडांचा खच नदीपात्रात दिसतो. माडगी, बाम्हणी, कोष्टी, बोरी, उमरवाडा, रेंगेपार ही गावे येणाऱ्या काळात नदीपात्रात गडप होण्याची भिती आहे.
मागील वर्षी संभाव्य धोका टाळता यावा म्हणून तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा व परिसरातील नदीघाटांचा लिलाव करण्यात आला होता. तिरोडा तालुक्यात रेतीचे ढिगारे तयार झाल्याने नदीचे पाणी तुमसर तालुक्यातील गावाकडे वळते झाले होते. यावर्षी अदानी समूह, धापेवाडा सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा करण्यात आल्याने तथा तिरोडा तालुक्यातील नदीघाट लिलावाने काही प्रमाणात तुमसर तालुक्यातील नदी काठावरील शेती खचण्याला लगाम लागल्याचे दिसून आले.
रेंगेपार येथेही यावर्षी अनेक आंदोलने झाली होती. परंतु निकाल अजूनपर्यंत लागला नाही. केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आले आहे.
खासदार व आमदार एकाच पक्षाचे असल्याने आता अच्छे दिनाची प्रतीक्षा नदीकाठावरील ग्रामस्थांना आहे. केंद्र शासन गंगेकडे लक्ष देत असताना येथे वैनगंगेकडे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)