शस्त्राच्या धाकावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
By Admin | Updated: September 20, 2014 01:23 IST2014-09-20T01:23:25+5:302014-09-20T01:23:25+5:30
मुंबई हावडा या प्रमुख रेल्वे महामार्गावर

शस्त्राच्या धाकावर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
पाच आरोपींचा समावेश : रेल्वे सुरक्षा बळाची कारवाई
तुमसर : मुंबई हावडा या प्रमुख रेल्वे महामार्गावर नागपूर-गोंदिया व पुढे राजनांदगाव-रायपूरपर्यंत रेल्वे प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी मागील अनेक दिवसापासून सक्रिय आहे. त्यापैकी पाच जणांच्या एका टोळीला गजाआड करण्यात रेल्वे सुरक्षा बळाला यश मिळाले आहे.
तीन आरोपींना तुमसर रोड रेल्वेस्थानक परिसरातुन, एक आरोपी खापा (तुमसर) तर अन्य एका आरोपीला तिरोडा येथून अटक केली. सनी भलावे, धनराज राऊत, गोलू चौधरी, रोहित मेश्राम, संजय अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी गोंदिया येथील आहेत.
गोंदिया जवळील गंगाझरी येथील स्टेशन मास्तर यांनी तुमसर रोड येथील रेल्वे सुरक्षा बळाचे प्रमुख पी.के. टेंभूर्णीकर यांना या टोळीसंदर्भात सूचना केली. पाच आरोपी रायपूर-इतवारी लोकल गाडीतून प्रवास करीत आहेत. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर लोकल आल्यावर तिची कसून तपासणी रेल्वे सुरक्षा बळाने केली, परंतु त्यात आरोपी दिसले नाही.
दरम्यान एका खबऱ्याने रेल्वे सुरक्षा बळाला माहिती दिली की पाच युवक हातात शस्त्रे घेवून रेल्वेस्थानक परिसरात फिरत आहेत. रेल्वे सुरक्षा बळाने रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून तीन आरोपींना शिताफिने पकडले.
दरम्यान दोन आरोपी फरार झाले. रात्री ११ वाजताच्या सुमारास चवथ्या आरोपीला खापा (तुमसर) येथे अटक केली. नागपूरवरून रात्री ११ वाजता सुटणारी शिवनाथ एक्सप्रेस, नागपूर-चक्रधरपूर, नागपूर ईतवारी पॅसेंजर, इंटरसीटी एक्स्प्रेस तथा इतर प्रवाशी गाडीतून शस्त्रासह टोळ्या प्रवास करतात. पुढे छत्तीसगड येथील दुर्ग, राजनांदगाव, रायपूरपर्यंत काही मोठ्या टोळ्या शस्त्राच्या धाक दाखवून प्रवाशांना लुटत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत, परंतु यावर आतापर्यंत अंकुश लावण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे.
रात्रीच्या सुमारास शस्त्रासह लुबाडणारी टोळी प्रवाशी डब्यात शिरल्याने प्रवाशी अक्षरक्ष: घाबरून आपल्याजवळील सोने व रोख या टोळींच्या स्वाधीन करतात. प्रवाशी डब्यात प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले असतानाही टोळी राजरोसपणे लुबाडत आहे. यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या रेल्वे मार्गावर पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)