हा खेळ ऊन्ह-सावल्यांचा
By Admin | Updated: September 27, 2014 01:10 IST2014-09-27T01:10:37+5:302014-09-27T01:10:37+5:30
२५ वर्षांची युती तुटली आणि १५ वर्षांची आघाडीही बिघडली. पदाधिकारी सैरभैर झाले.

हा खेळ ऊन्ह-सावल्यांचा
भंडारा : २५ वर्षांची युती तुटली आणि १५ वर्षांची आघाडीही बिघडली. पदाधिकारी सैरभैर झाले. काल एका पक्षातला आज दुसऱ्या पक्षात दिसत आहे. भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काडीमोड झाल्यामुळे उमेदवारांची जमवाजमव सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी काँग्रेसने तुमसर व साकोलीत उमेदवारी जाहीर केली. परंतु, भंडाऱ्यात अद्याप नाव घोषित केलेले नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने अद्याप एकाही मतदारसंघातील नावे घोषित केलेली नाही. शिवसेनेने भंडारा, तुमसर येथे उमेदवारी घोषित केली असली तरी साकोलीत सेनेचा उमेदवार घोषित केलेला नाही. त्यातच कालपर्यंत भाजपावासी असलेले आज राष्ट्रवादीमध्ये तर काही शिवसेनेत गेले आहेत. उद्या शनिवारला उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे, तरीही उमेदवार घोषित झालेला नाही, शेवटच्या दिवशी उमेदवार घोषित होण्याची, ही बहुधा पहिली वेळ असावी.
तुमसर विधानसभा
भंडारा : तुमसर विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे तर युतीच्या जागा वाटपात भाजपकडे होता. विद्यमान आमदार अनिल बावनकर यांची उमेदवारी कापून काँग्रेसने प्रमोद तितीरमारे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज असलेले बावनकर हे उद्या शनिवारला अपक्ष नामांकन दाखल करण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे युती आणि आघाडीत काडीमोड झाल्यामुळे तीनदा आमदार राहिलेले भाजपचे मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. परंतु सायंकाळपर्यंत त्यांचा प्रवेश झालेला नव्हता. किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य चरण वाघमारे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यांच्या नावाची सायंकाळपर्यंत घोषणा झालेली नव्हती. मनसेने विजय शहारे यांना तर बसपाने नामदेव ठाकरे यांना रिंगणात उतरविले आहे.
भंडारा विधानसभा
भंडारा : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेला भंडारा विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे होता. ही जागा शिवसेनेने जिंकली होती. आज शुक्रवारला सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, बसपाच्या देवांगणा विजय गाढवे, मनसेचे मनोहर खरोले यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. आघाडी बिघडल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. परंतु यापैकी एकाही काँग्रेसने सायंकाळपर्यंत उमेदवार घोषित केला नव्हता. भाजपकडून रामकुमार गजभिये यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु त्यांचेही नाव घोषित झालेले नव्हते. काँग्रेसकडून प्रेमसागर गणवीर यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश डोंगरे, सच्चिदानंद फुलेकर, सुमेध श्यामकुवर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. युवाशक्ती संघटनेकडून शशिकांत भोयर यांचे नाव चर्चेत असून याठिकाणी लढत रोमांचक होणार आहे.
साकोली विधानसभा
भंडारा : साकोली विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे तर युतीच्या जागा वाटपात भाजपकडे होता. याठिकाणी भाजपचे नाना पटोले विजयी झाले होते. आता ते लोकसभेत पोहोचले असून भाजपने अद्याप उमेदवारी घोषित केलेली नाही. काँग्रेसने माजी आमदार सेवक वाघाये यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून बाळा काशीवार यांचे नाव चर्चेत आहे. शुक्रवारला सायंकाळी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिलेले डॉ. प्रशांत पडोळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या मतदारसंघात बसपा आणि मनसेचे उमेदवार अद्याप घोषित झालेले नाहीत. या मतदारसंघात कुणबी समजाचे प्राबल्य असले तरी ते विविध प्रवर्गात विखुरले आहेत. त्यामुळे एका समाजातून किती उमेदवार रिंगणात राहतात. आणि कोणत्या प्रवर्गाला मतदार जवळ करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.