मकरसंक्रातीच्या साहित्यांनी गजबजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:29 IST2018-01-11T22:29:16+5:302018-01-11T22:29:28+5:30
नववर्षाला प्रारंभ झाल्यानंतर लगबग लागते ती मकरसंक्रांतीच्या तयारीची. वाणाच्या साहित्यांसह कापडांची दुकाने ग्राहकांमुळे गजबजू लागली आहे. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर बाजारपेठेत लाखोंची उलाढालही या निमित्ताने होणार आहे.

मकरसंक्रातीच्या साहित्यांनी गजबजली बाजारपेठ
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नववर्षाला प्रारंभ झाल्यानंतर लगबग लागते ती मकरसंक्रांतीच्या तयारीची. वाणाच्या साहित्यांसह कापडांची दुकाने ग्राहकांमुळे गजबजू लागली आहे. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर बाजारपेठेत लाखोंची उलाढालही या निमित्ताने होणार आहे.
मकरसंक्रांती हा तसा महिलांचा सण. परंतु शास्त्रोक्त दृष्टीने बघितल्यास १४ जानेवारीला सुर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकरसंक्रांतीच्या या सणाला पुण्यकाल म्हणूनही संबोधले जाते. यात सोन्या-चांदीच्या वस्तु खरेदीसह वाहन व संपत्ती खरेदी विक्रीचा व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असतो. दरम्यान बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढल्याने बाजारात रंगत आली आहे.
पतंग विक्रीलाही उधाण
संक्रांतीचा सण जसजसा जवळ येत जातो तस तसा पतंग विक्रीचाही व्यवसायातही वाढ होत जाते. मोठ्या बाजारातील शर्मा बालोद्यान परिसरात असलेल्या पतंगीच्या दुकानात बाल-गोपालांची सकाळी ६.३० वाजतापासूनच गर्दी दिसून येते. नॉयलॉन मांजावर बंदी आहे. त्यामुळे पतंग शौकीन साध्या मांजावरच पतंगाचा डावपेच साधत आहे.
वाण खरेदीसाठी गर्दी
मकरसंक्रांतीच्या सणाला तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. संक्रांतीच्या निमित्ताने वाण वाटण्यासाठी विविध साहित्य खरेदी केली जातात. सध्या गांधी चौक ते पोष्ट आॅफिस चौकापर्यंतच्या मार्गावर वाण विक्रीच्या साहित्यांनी दुकाने सजली आहेत. यात महिलांची गर्दी दिसून येते. चमचे, वाट्या, प्लेट्स, करंडे, ग्लास या वाण साहित्याची सर्वात जास्त विक्री होत असते. यात बालकांसाठी लूट करण्याचे साहित्यही आहे.