भावी शिक्षक 'टीईटी'साठी सज्ज!
By Admin | Updated: January 16, 2016 00:48 IST2016-01-16T00:48:13+5:302016-01-16T00:48:13+5:30
शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे.

भावी शिक्षक 'टीईटी'साठी सज्ज!
आज परीक्षा : परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त
भंडारा : शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात उद्या शनिवार, १६ जानेवारीला या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘डीटीएड’चा अभ्यासक्रम पूर्ण करुनही नोकरी मिळविण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांची भटकंती सुरु आहे. शिक्षक व्हायचे असेल तर सर्वप्रथम ‘टीईटी’ला सामोरे जा, या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावरुन शनिवारी दोन विषयांच्या पेपरसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.
राज्यात तुर्तास डी.एड. करून बेरोजगारीची झळ सोसणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखाच्या घरात आहे. त्यानंतरही नोकरी मिळेल, जागा निघतील, अशा भाबड्या आशेपोटी राज्यातील हजारो ‘डीटीएड’धारक विद्यार्थी पात्रता परीक्षेला सामोरे जात आहेत.
राज्यात २२ हजार शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर ‘टीईटी’ परीक्षा घेऊन राज्य शासन बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक तर करीत नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. अशाही परिस्थितीत १६ जानेवारीला जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवरुन होणाऱ्या ‘टीईटी’साठी जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)
२३ परीक्षा केंद्रावर ५,४७१ परीक्षार्थी
शिक्षक पात्रता परीक्षा दोन सत्रात होत असून पेपर १ (इयत्ता १ ते ५) १३ परीक्षा केंद्रावर ३,२९९ परीक्षार्थी परीक्षा देणार असून या पेपरची वेळ सकाळी १०.३० ते १ वाजतापर्यंत असेल. पेपर २ (इयत्ता ६ ते ८) १० परीक्षा केंद्रावर एकूण २,१७२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. पेपर २ ची वेळ दुपारी २ ते ४.३० वाजतापर्यंत असेल. परीक्षार्थ्यांनी निर्धारीत वेळेच्या ४५ मिनीटे अगोदर परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उपस्थित राहावे, असे शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.
अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायम
शासन एकीकडे शिक्षक अतिरिक्त ठरवत आहे. दुसरीकडे पदभरतीचा आव आणत आहे. या गदारोळात आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांची समस्या कायम आहे. त्यामुळे अगोदर त्यांच्या बदल्यांचा प्रश्न निकाली काढला आणि त्यानंतर रिक्त होणाऱ्या जागा भरा, असाही एक सूर यानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातून आळविला जात आहे. यासह अगोदरच अतिरिक्त शिक्षक असल्यानंतर नव्याने पदभरती कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन शिक्षण विभाग बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांकडून होत आहे.