भविष्यातील उद्योजक एमआईईटीत घडतील
By Admin | Updated: March 7, 2016 00:27 IST2016-03-07T00:27:27+5:302016-03-07T00:27:27+5:30
आजच्या घडीला नौकरी सोबतच उद्योजकता विकास महत्वाचा असून तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वत: लोकांना नोकरी देण्याचे काम करण्याइतपत मोठे व्हावे.

भविष्यातील उद्योजक एमआईईटीत घडतील
एमआईईटीमध्ये टेक्सोसन्सची सांगता : शैलेंद्रसिंह राठोर यांचे प्रतिपादन
शहापूर : आजच्या घडीला नौकरी सोबतच उद्योजकता विकास महत्वाचा असून तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वत: लोकांना नोकरी देण्याचे काम करण्याइतपत मोठे व्हावे. तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रिक डिग्री घेऊन उत्तम उद्योजक बनण्याचे स्वप्न तरुण अभियंत्यांनी जोपासले तर भविष्यात ते निश्चितच स्वत:च्या व पर्यायाने देशाच्या हिताचे ठरेल, असे प्रतिपादन डॉ. शैलेंद्रसिंह राठोर यांनी केले. स्थानिय मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सोसन्स २०१६ व आगाज २०१६ च्या समारोपिय समारंभात बोलत होते.
दोन दिवस चाललेल्या तांत्रिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून डी. एम. धारगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शीला भुरे, प्राचार्य नुतन कन्या ज्यु. कॉलेज, डॉ. प्रल्हाद हरडे, प्राचार्य प्रा. शाहीद शेख प्रो. मो. नासीर, प्रा. अश्विनी लाडे उपस्थित होते. भंडारा जिल्हा उद्योजकता विकास केंद्र व मनोहरभाई पटैल अभियांत्रिकी महाविद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या उद्योजकता विकास केंद्राच्या शाखेमुळे अभियंता तरुणांना रोजगाराचा नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. ज्यामुळे जिल्ह्यात नविन दमाचे तरुण उद्योजक तयार होतील. तांत्रिक ज्ञानाच्या पार्श्वभूमीमुळे नवीन कंपनी सुरु करणे अभियंता तरुणांसाठी जास्त सोपे व सोईस्कर आहे.
भंडारा जिल्ह्यातील स्थानिक गरजा व स्थानिक कच्चा मालाच्या उपलब्धतेनुसार उद्योजकता विकास केंद्राचे, मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्र मार्गदर्शन करणार असल्यामुळे ही जिल्ह्यातील तरुणांसाठी पर्वणीच ठरणार आहे. हा पुढाकार घेणारे नागपूर विद्यापीठ कक्षेतील हे एकमेव महाविद्यालय असल्यामुळे हे निश्चितच जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याची भावना प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. धारगावे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विविध तांत्रिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थांचा तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेल्या तीर्थराज गोटेफोडे, द्वितीय वर्षातील प्रियंका जैस्वाल, तृतीय वर्षातील प्रियंका पवार यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या व मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक विजेता प्रियंका जैस्वाल या महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचा हितासाठी विद्यालयाने चालविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थी समन्वयक म्हणून आशु ठाकरे व अपूर्व निर्वाण यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन अवंतिका लांजेवार व भावना वैद्य यांनी केले. आभार प्रा. अश्विनी लाडे यांनी व्यक्त केले.
(वार्ताहर)