करडी परिसरात कोरोना नियमांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:40+5:302021-04-07T04:36:40+5:30
युवराज गोमासे करडी (पालोरा) : करडी परिसरात कोरोना नियमांचा खुलेआम फज्जा उडविला जात आहे. ना मास्क, ना सामाजिक अंतर ...

करडी परिसरात कोरोना नियमांचा फज्जा
युवराज गोमासे
करडी (पालोरा) : करडी परिसरात कोरोना नियमांचा खुलेआम फज्जा उडविला जात आहे. ना मास्क, ना सामाजिक अंतर राखले जात आहे. शाळा- महविद्यालयेवगळता सर्व दुकाने, पानटपऱ्या, अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत. सर्वत्र सैराट कारभार सुरू असल्याचे पदोपदी जाणवत आहे. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाच्या सूचनांनासुद्धा केराची टोपली दाखविली जात आहे. परिणामी कोरोना सामाजिक संक्रमण वाढण्याचा धोका आहे.
शासनाचे आदेशानुसार करडी परिसरात शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली.
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावागावात अँटिजेन तपासणी व कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. काल केसलवाडा येथे थेट रोजगार हमी योजना कामावर जाऊन मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत ७ मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना आरोग्य विभागाच्या निर्देशाखाली होम क्वाॅरण्टाइन करण्यात आले.
काल पालोरा ग्रामपंचायतीच्या वतीने रोहयो कामावर येण्यास इच्छुक मजुरांना आधी कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तपासणी करून निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणाऱ्या मजुरांचे काम मागणी अर्ज स्वीकारून रोजगार दिले जाणार असल्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आज पालोरा येथील आरोग्य उपकेंद्रात १२५ लोकांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. तपासणीत सात इसम पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना होम क्वॉरण्टाइन करून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्याचे सुचित करण्यात आले.
दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आतापर्यंत परिसरातील मुंढरी, करडी, देव्हाडा, ढिवरवाडा, पालोरा, जांभोरा, केसलवाडा गावात कोरोना रुग्ण आढळून आले असून, तपासण्यांचा वेग वाढताच रुग्णसंख्या झपाट्याने वाढलेली दिसण्याचे संकेत आहेत.
सामाजिक संक्रमण रोखण्याचा भाग म्हणून शासनाच्या वतीने कडक निर्बंध लावले असले तरी आजही करडी परिसरात विनामास्क नागरिक फिरताना दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. सामाजिक अंतर राखले जात नाही. डीजे वाजवित मोठ्या थाटात लग्न, तेरवी व अन्य सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जात आहेत. कोरोना वाढत असतानाही दुकाने, आस्थापना, हॉटेल, चायपान टपऱ्या, मोहफुल दारू अड्डे, सट्टापट्टी, खुलेआम विनाधाक सुरू आहेत.