एकाच दिवशी तीन जणांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:19 IST2017-05-23T00:19:48+5:302017-05-23T00:19:48+5:30
एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत.

एकाच दिवशी तीन जणांवर अंत्यसंस्कार
मोहगावदेवी येथील घटना : गावात शोककळा, तापमानाचा प्रभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत. गावात कुण्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अख्खे गाव त्या कुंटुंबियासोबत असते. मात्र २४ तासांच्या आत एक नव्हे लागोपाठ तीन व्यक्तींच्या मृत्युने मोहगावदेवी हा गाव शोकसागरात बुडाला.
मृत्युच्या मार्गाने प्रत्येकालाच जाणे आहे. मृत्यु ही नैसर्गीक चक्राची प्रक्रिया मानली गेली आहे, पण गावात मृत्युची साखळी बनून जात असेल तर निश्चितच कळायला मार्ग उरत नाही. अशीच दु:खदायी घटना मोहगाव देवी या गावात घडली. मिलिंद रामटेके या नावाचा विवाहित तरूणाचा मृत्यू शनिवारच्या रात्री झाला.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारच्या पहाटे हरी लेंडे यांचा मृत्यु झाला. त्यांच्यावर त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारीच सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान परसराम लेंडे या वृद्धाचे निधन झाले. यांच्यावर सुरनदी येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पाठोपाठ गावातील एक तरूण व दोन वृद्धांचे निधन झाले.
एक झालं की दुसऱ्यांच्या अंत्यविधीला जाण्याचा दुर्देवी योग मोहगाववासीयांना आला. मोहगाव देवी येथील सरपंच राजेश लेंडे यांच्या कुटूंबातील दोन वृद्धांनी प्राण सोडले तर घरचा कमावता मिलिंद रामटेके गेल्याने कुटूंबातील पत्नी व मुलांवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.
एकाच दिवशी तीन परिवारांना दु:खाचा डोहात सोडणारा दुर्देवी अनुभव जनतेनी बघितला आहे.
सध्या उन्हाचा तडाखा फार आहे. दिवसभर उष्ण लाटा सुरू असतात. गावात वीजेची भानगड. कुलर चालत नाही. वीज राहत नाही. खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे गावकरी त्रस्त झालेली आहेत.
स्वत:च्या बचावणासाठी बरीच जण गावातील पानठेल्यावर वा गावाशेजारच्या वृक्षसावलीत दिवस काढतात. पण, रात्री गेली वीज मरणयातना देवून जाते. याच बाबींचा परिणाम मोहगावदेवी व अन्य ग्रामीण भागातील जनतेला सोसावा लागतो. सुर्यदेव आग ओकत आहे. मोहगाव देवी येथे तर प्रचंड तापमानाच्या प्रभावाने वृद्ध मंडळींना जीव गमवावा लागत असल्याचा गावकऱ्यांचे जाहीररीत्या म्हणने आहे.
इकडे ग्रामीण भागात सिंगल फेज असल्याने कुलरही फिरत नाही. अंगाची दाहकता शमवणारा गारवा ग्रामीण जनतेला मिळत नसल्याने उष्माघात प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याच्या परिणामाने लोकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.