सभामंडप, रस्ते, विंधन विहीरीवर निधी खर्च
By Admin | Updated: July 24, 2014 23:42 IST2014-07-24T23:42:00+5:302014-07-24T23:42:00+5:30
वर्षाकाठी आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी सभामंडप व सिमेंट रस्ते, डांबरीकरण, विंधनविहीरी यावरच खर्ची घातल्याचे वास्तव पाहणीत आढळून आले आहे.

सभामंडप, रस्ते, विंधन विहीरीवर निधी खर्च
भंडारा : वर्षाकाठी आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी सभामंडप व सिमेंट रस्ते, डांबरीकरण, विंधनविहीरी यावरच खर्ची घातल्याचे वास्तव पाहणीत आढळून आले आहे.
वार्षिक नियोजन राबविताना निधीअभावी जी लोकोपयोगी कामे शिल्लक राहतात, अशी कामे आमदार निधीतून करावयाची असतात. आमदार या निधीतून कोणती कामे करतात, याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने २००९-१४ या पाच वर्षातील कामांची यादी मिळविली असता आमदारांचे आरोग्य, शाळा, उद्यानाला निधी देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.
भंडारा जिल्ह्यात एक लोकसभा सदस्य, तीन विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य आहेत. त्यापैकी भंडाऱ्याचे आ.नरेंद्र भोंडेकर यांनी विंधन विहीरी, सभामंडप, संगणक, सिमेंट रस्त्याच्या कामावरच भर दिला आहे़ त्यांनी ही कामे भंडारा आणि पवनी तालुक्यात केली आहेत.
साकोलीचे तत्कालीन आ.नाना पटोले यांनीही सभामंडप, विंधन विहीरी, चावडी, सिमेंट रस्ता, पाणीपुरवठा या कामावर भर दिला. त्यांनी साकोली, लाखनी व लाखांदूर या तालुक्यात ही कामे केली आहेत.
तुमसरचे आ.अनिल बावनकर यांनी रस्त्याचे सिमेंटीकरण, सभामंडप, विंधन विहीरी, खडीकरण, संगणक, तुमसर शहरात पाईपलाईन, व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी दिला आहे़ त्यांनी ही कामे तुमसर आणि मोहाडी तालुक्यात केली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)