सुरक्षेअभावी उड्डाण पूल बांधकाम धोकादायक
By Admin | Updated: October 7, 2015 01:48 IST2015-10-07T01:48:07+5:302015-10-07T01:48:07+5:30
तुमसर रोड उड्डाण पुलाचे पुन्हा काम सुरु झाले. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तुमसर गोंदिया रामटेक राज्यमार्ग धोकादायक ठरत आहे.

सुरक्षेअभावी उड्डाण पूल बांधकाम धोकादायक
वाहनधारकांना धोका : रेडियमच्या पट्ट्या लावणे गरजेचे
तुमसर : तुमसर रोड उड्डाण पुलाचे पुन्हा काम सुरु झाले. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तुमसर गोंदिया रामटेक राज्यमार्ग धोकादायक ठरत आहे. सहा दिवसापूर्वी येथे एका तरुण रेल्वे अभियंत्याला अपघातात जीव गमवावा लागला. बायपास रस्त्याच्या कामावर रेडीयम पट्टीऐवजी साधी कापडी पट्टी लावलेली आहे. रात्रीला सुरक्षारक्षकाची उपस्थिती आवश्यक आहे.
तुमसर रोड रेल्वे फाटक ५३२ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तुमसर व रामटेक रस्त्यावरील बायपास रस्ता तयार करण्यात येत आहे. जुना डांबरीकरण रस्त्याच्या खाली हे काम सुरु आहे. डांबरी रस्ता उंच व बायपास रस्ता खाली झाल्याने खड्डा पडला आहे. सुरक्षेकरिता डांबरी रस्त्यावर रेतीची पांढरी पोती व समांतर रेषेत काड्या बांधून पांढरी दोरीवजा पट्टी बांधण्यात आली. परंतु रात्री अंधारात अस्पष्ट दिसते. रहदारीचा मार्ग असल्याने येणारे जाणारे वाहनामुळे रस्ता अरुंद झाला आहे. नवीन वाहनधारकांना एकदम लक्षात येत नाही. त्यासाठी सूचना देणारे कर्मचारी राहत नाही. सहा दिवसापूर्वी तरुण रेल्वे अभियंत्याचा अपघाती मृत्यू झाला. रात्री स्पष्ट दिसण्याकरिता रेडीयमची लाल पट्टी येथे लावणे गरजेचे आहे. ४० कोटीचा हा उड्डाणपुल असून बरेच दिवस काम चालणार आहे. सुरक्षेच्या उपाययोजनेकडे दुर्लक्ष केल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)