भरपावसात बचत गटाचा मोर्चा
By Admin | Updated: July 11, 2017 00:18 IST2017-07-11T00:18:24+5:302017-07-11T00:18:24+5:30
जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व एजंट कर्जधारक असलेल्या महिलांना मानसिक त्रास देऊन शारीरिक त्रास देण्याची धमकी देत आहेत,...

भरपावसात बचत गटाचा मोर्चा
लाखोंची फसवणूक : मायक्रो फायनान्सच्या एजंटवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व एजंट कर्जधारक असलेल्या महिलांना मानसिक त्रास देऊन शारीरिक त्रास देण्याची धमकी देत आहेत, अशांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख राकेश चोपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे भरपावसात या महिला न्यायासाठी तग धरून होत्या. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मायक्रो फायनान्स कंपनीचे एजंट कर्जधारक महिलांच्या घरी जावून पैसे वसुलीसाठी धमकी देतात. तसेच पंधरा ते वीस एजंट जबरदस्तीने पैसे वसुल करु अशी दमदाटी देवून मानसिक व शारीरिक त्रास देण्याची धमकी देतात. अशा एजंटांवर कारवाई करुन होणाऱ्या मानसिक त्रासापासून मुक्त करण्यात यावे, अन्यथा आम्ही आत्महत्या करावी काय? असा सवाल या महिलांनी उपस्थित केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राकेश चोपकर, सचिन मेश्राम, प्रमोद केसरकर, प्रविण मेहर, दिनेश मांढरे, सेलोकर, मंदा वरकडे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.