ग्रामस्थांचा वनकार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: December 23, 2016 00:31 IST2016-12-23T00:31:33+5:302016-12-23T00:31:33+5:30

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पाेरेशन महाराष्ट्र यांना माडगी (टेकेपार), पुरकाबोडी परिसरातील जंगल हस्तांतरीत करण्यात येऊ नये,

Front for the villagers | ग्रामस्थांचा वनकार्यालयावर मोर्चा

ग्रामस्थांचा वनकार्यालयावर मोर्चा

अधिकाऱ्यांना निवेदन : एफडीसीएमला जंगल हस्तांतरीत करू नका
भंडारा : फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पाेरेशन महाराष्ट्र यांना माडगी (टेकेपार), पुरकाबोडी परिसरातील जंगल हस्तांतरीत करण्यात येऊ नये, या मागणीसाठी माडगी व पुरकाबोडी येथील ग्रामस्थांनी माडगी येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. वनाधिकाऱ्याला मागण्याचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
माडगी व पुरकाबोडी गावाचे जंगल वनविभाग भंडारा (प्रादेशिक) यांच्याकडे आहे. सदर जंगल फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पाेरेशन महाराष्ट्र (एफडीसीएम) ला हस्तांतरीत करण्याचे शासनाचे आदेश आहे. एफडीसीएमचे कर्मचारी माडगी परिसरातील जंगलाची पाहणी करीत आहे. या जंगलाशेजारी माडगी, टेकेपार, खुर्शीपार, खुटसावरी, पिंपळगाव, पुरकाबोडी, येटेवाही, तिर्री, शेगाव ही गावे आहेत. या गावामध्ये आदिवासी बांधवांची वस्ती आहे. या जंगलामधून माडगी परिसरातील गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मोहफूल, चार, चारोळ्या, तेंदू संकलन, डिंक, सिंधीपासून झाडू, मध गोळा करण्याची कामे करतात. हे जंगल एफडीसीएमला हस्तांतरीत झाल्यास माडगी परिसरातील नागरिकांवर उपासमारीचे संकट ओढवू शकते.
सदर वनक्षेत्र एफडीसीएमला हस्तांतरीत न करता वनविभाग भंडारा (प्रादेशिक) यांच्या ताब्यात राहू द्यावे, त्यासंदर्भात ग्रामपंचायतींनी ठराव देखील घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माडगी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) व उपवनसंरक्षक यांना पाठविले आहेत. निवेदनावर सरपंच हेमलता ढोणे, प्रमोद नागापुरे, सुधाकर ढोणे, प्रशांत गजभिये, संदीप दायरे, देवांगना नळपते, सुलभा खोब्रागडे, रंजना ठवरे, सीता क्षीरसागर, नीळकंठ रणदिवे, कवळू शांतलवार, पुरूषोत्तम पाल, किशोर मस्के, राजू मस्के, गोवर्धन चेटूले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Front for the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.