शेतकऱ्यांचा सावकाराच्या दुकानावर मोर्चा
By Admin | Updated: August 25, 2015 00:48 IST2015-08-25T00:48:28+5:302015-08-25T00:48:28+5:30
खासगी सावकारांकडे दागिने गहाण ठेवून घेतलेले कर्ज शेतकऱ्यांसाठी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

शेतकऱ्यांचा सावकाराच्या दुकानावर मोर्चा
दोन तास रस्ता अडविला : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
लाखांदूर : खासगी सावकारांकडे दागिने गहाण ठेवून घेतलेले कर्ज शेतकऱ्यांसाठी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र सदर निर्णय खासगी सावकार ऐकत नसल्याने हजारो शेतकऱ्यांनी डोकेसरांडी येथील सावकाराच्या दुकानावर धडक मोर्चा काढला. यात यावेळी दोन तास रस्ता अडविल्यानंतर तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात आज (सोमवारी) तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी डोकेसरांडी येथील एका सावकाराच्या सोन्याचांदी दुकानावर धडक मोर्चा काढला. शेतीसाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सदर सावकाराकडे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले. शासनाने खासगी सावकारांकडे असलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.मात्र सावकार ऐकत नसल्याने प्रकरण सहाय्यक निबंधक कार्यालय लाखांदूर यांच्याकडे वळते करणे गरजेचे होते. परंतु तसे प्रस्ताव सादर न केल्याने व शेतकऱ्यांची कर्जमाफी ग्राह्य धरून दागिने परत करण्यास सावकाराने विरोध दर्शविल्याने आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पवनी लाखांदूर मार्ग अडवून धरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर तहसीलदार विजय पवार आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. यात सहाय्यक निबंध कार्यालयात प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार, कर्ज प्रकरणातील बोगस पावती ग्राह्य धरली जाणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)