चौरास भागाचा वाळवंट होणार
By Admin | Updated: March 14, 2016 00:31 IST2016-03-14T00:31:44+5:302016-03-14T00:31:44+5:30
पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात पाण्याची पातळी खोल गेली आहे.

चौरास भागाचा वाळवंट होणार
जलस्तरात घट : जमिनीतील भूमिगत प्रवाह बंद, उपाययोजनांसाठी पुढाकारांची गरज
चरणदास बावणे कोंढा (कोसरा)
पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात पाण्याची पातळी खोल गेली आहे. गोसे प्रकल्पाचे बांधकाम करताना भूमीगत प्रवाह बंद केल्याने उन्हाळ्यात हिरवागार दिसणारा परिसर सध्या दिसत नाही. चौरासचे भागाचे वाळवंट होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
चौरास भागात वाहत जाणाऱ्या भूमीगत प्रवाहाला तत्कालीन लोकप्रतिनिधी विलासराव शृंगारपवार यांनी प्रवाह बंद करण्यात येवू नये अशी मागणी सतत लावून धरली होती. भूमीगत प्रवाह बंद करावयाचे असेल तर आधी गोसे प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होऊ द्या, तसेच दोन्ही कालव्यात पाणी सुरु झाल्यानंतर प्रवाह बंद करण्यात यावे, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत भूमीगत प्रवाह बंद केले. सन २००१ पासून चार वर्षे हे काम चालले. भूमीगत पात्रात 'डायप्राय वॉल' बेन्टोनाईट माती व सिमेंट घालून कायमचा प्रवाह बंद केला. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार यांनी भूमीगत प्रवाह बंद केल्यास चौरास भागातील पाण्याची पातळी कमी होईल आणि भविष्यात चौरास भागाचा वाळवंट होईल, असा इशारा दिला होता. परंतु याकडे लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम सध्या दिसत आहे. १५ वर्षाचा कालावधी झाला. या काळात चौरास भागाचा जलस्तर कमी झाला आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या ३०० ते ४०० मीटर बोअर करून देखील विहिरीला पाणी मिळत नाही. गोसे प्रकल्पाचे काम तसेच मुख्य दोन कालव्याचे काम झाल्यानंतर डाव्या, उजव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर भूमीगत प्रवाह बंद केले असते तर, चौरास भागात आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. ५ एकर शेती असलेले शेतकरी उन्हाळी धानपिक घेताना विहिरीचे पाणी किती जमिनीला होईल याचा विचार करूनच उन्हाळी लागवड सध्या करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात हिरवेगार दिसणारा चौरास भाग सध्या वाळवंटासारखा ओसाड दिसत आहे. उन्हाळी धान लागवडीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. भविष्यात हेही प्रमाण कमी होऊ शकते.
वर्षातून तीन पिके घेणारे शेतकरी सध्या दोन पिक घेण्यास मागेपुढे पाहत आहेत. चौरासचा जलस्तर घसरला आहे. हे सध्या सिंचन विभागाचे अधिकारी देखील मान्य करतात. चौरास भागातून गोसे प्रकल्पाचा डावा कालवा जात आहे. त्याचे काम १५ वर्षापासून पूर्ण होत नाही. ही एक शोकांतिका आहे. डाव्या कालव्यात बाराही महिने पाणी सोडले तर चौरास भागातील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. सिंचन विभागाचे अधिकारी व मोठे कंत्राटदार यांचे हात या कालव्याच्या कामात गुंतले आहेत. कोणी कंत्राटदार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऐकत नाही. सध्या मंत्री, आमदार यांचे देखील डाव्या कालव्याच्या कामात कंत्राटदार म्हणून काम करीत असल्याची ओरड आहे. त्यामुळे देखील अधिकारी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असावे असे बोलले जात आहे. पण सध्या चौरास भागाचा वाळवंट होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समोर येऊन गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.