चार तालुके कोरोनामुक्त, ॲक्टिव्ह रुग्ण सहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:56+5:302021-07-15T04:24:56+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णत: ओसरली आहे. गत तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्ण सिंगल डिजीटमध्ये आढळत आहे. तर ...

चार तालुके कोरोनामुक्त, ॲक्टिव्ह रुग्ण सहा
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णत: ओसरली आहे. गत तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्ण सिंगल डिजीटमध्ये आढळत आहे. तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखांदूर या चार तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या निरंक असून हे चारही तालुके कोरोनामुक्त झाले आहे. तर पवनी आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी एक तर साकोली तालुक्यात चार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे भंडारा तालुक्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. दररोज सरासरी १०० च्या आसपास रुग्ण आढळत होते. दुसऱ्या लाटेत तर ही संख्या ३०० ते ४०० पर्यंत पोहोचली होती. परंतु प्रशासनाच्या निरंतर प्रयत्नाने आता कोरोना नियंत्रणात आला आहे. भंडारा तालुक्यात आता एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही. त्या पाठोपाठ तुमसरमध्येही रुग्णांची संख्या मोठी होती. हा तालुकाही कोरोनामुक्त झाला आहे.
बुधवारी ८२५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ साकोली तालुक्यात दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सहा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ७९७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ५८ हजार ६६१ व्यक्तींनी कोरोनार मात केली. तर ११३० व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला.
बॉक्स
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के
भंडारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण ६५ टक्क्यापर्यंत खाली आले होते. सक्रीय रुग्ण ०.० १ टक्के असून मृत्यू दर १.८९ टक्के आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ०.२४ टक्के आहे. जिल्हा कोरोना मुक्तीच्या वाटेवर असून यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला मोठा दिलास मिळत आहे.