मूर्ती विटंबनाप्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: June 15, 2016 00:44 IST2016-06-15T00:44:29+5:302016-06-15T00:44:29+5:30
देव्हाडी येथील नेहरु वॉर्डात पुरातन हनुमान मंदिर आहे. सोमवारी सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करून तोडफोड केली.

मूर्ती विटंबनाप्रकरणी चौघांना अटक
तुमसर : देव्हाडी येथील नेहरु वॉर्डात पुरातन हनुमान मंदिर आहे. सोमवारी सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करून तोडफोड केली. याविरोधात स्थानिकांनी तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहरु वॉर्डातील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची माहिती स्थानिक नागरिक सायंकाळी पूजेकरिता गेले असता हा प्रकार लक्षात आला. क्षणात शेकडोंचा जमाव मंदिराबाहेर गोळा झाला. स्थानिक पोलिसांनी तुमसर ठाण्यात माहिती दिल्यावर ठाणेदार जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश हावरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव ताफ्यासह मंदिरात पोहोचले. संतप्त जमावाने रात्री ८ वाजता तुमसर - गोंदिया महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी स्थानिकांनी केली. राज्य महामार्गावर तणावाची स्थिती होती. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मंदिर तथा परिसराची पाहणी केली. रात्री मंदिरात पोलीस तैनात करण्यात आले होते. स्थानिक युवक व पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी रात्री मंदिर सील केले. पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा केली. मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी येथे करण्यात आली आहे. ठसे तज्ज्ञांना येथे पाचारण करण्याची मागणीही मंदिर समितीने केली. एक महिना हे मंदिर बंद राहणार असून १४ जुलै रोजी नवीन हनुमंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने ‘लोकमत’ला दिली. मंदिराबाहेर मादक साहित्य आढळून आले. अवैध दारू व गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मूर्ती विटंबनाप्र्रकरणी संशयित चार जणांना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-जगदीश गायकवाड
पोलीस निरीक्षक, तुमसर