सिंदपुरी तलावाचे चारही गेट धोकादायक स्थितीत
By Admin | Updated: July 24, 2014 23:43 IST2014-07-24T23:43:27+5:302014-07-24T23:43:27+5:30
सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलाव बुधवारील मध्यरात्रीच्या सुमारास फुटल्याने सिंदपुरी गाव जलमय झाले आहे. चार गेटपैकी एक गेट फुटला. तलावातील पाण्याचा दाब वाढल्याने ही घटना घडली.

सिंदपुरी तलावाचे चारही गेट धोकादायक स्थितीत
११० एकरांत तलाव : एक गेट फुटल्याने सिंदपुरी जलमय
तुमसर : सिंदपुरी येथील माजी मालगुजारी तलाव बुधवारील मध्यरात्रीच्या सुमारास फुटल्याने सिंदपुरी गाव जलमय झाले आहे. चार गेटपैकी एक गेट फुटला. तलावातील पाण्याचा दाब वाढल्याने ही घटना घडली. या तलावाचे चारही गेट नादुरुस्त स्थितीत आहेत. मागीलवर्षी हा तलाव जिल्हा परिषदेकडे होता. आता त्याचे हस्तांतरण लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) या विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
सिंदपुरी येथील मामा तलाव जुने असून या तलावाच्या पाळीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. या तलावाची डागडुजी कधीच झाली नाही. मागीलवर्षी थातूरमातूर डागडुजी करण्यात आली होती. पूर्वी हा खासगी तलाव होता. या तलावाची मालकी हेडाऊ यांच्याकडे होती.
१०० एकर जलसाठ्याचे क्षेत्र असले तर त्याची मालकी जिल्हा परिषदेकडे असते. हा तलाव १०० एकरापेक्षा मोठा असल्याने यावर्षी त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या माजी मालगुजारी तलावाच्या मालकीकरिता टोलवाटोलवीचा प्रकार सुरु होता.
सध्या या विभागाकडे निधी नाही. चार गेट नादुरुस्त आहेत. त्यापैकी एक मंगळवारी मध्यरात्री फुटला. त्यानंतर हा परिसर जलमय झाला होता. काही नागरिक घरातून पळाल्याची माहिती आहे. पूर्ण तलाव फुटण्याची येथे स्थिती असून फुटलेली गेट सध्या दुरुस्त करण्यात तांत्रिक अडचणी आहेत.
निधीअभावी दोन गेट पुढे रोजगार हमी योजनेतून दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. पूर्ण तलाव येथे सुरक्षित नसल्याने सिंदपुरी येथे भितीचे वातावरण आहे. बुधवारी येथे संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता दराडे, तहसीलदार सचिन यादव यांनी भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. तलाव दुरुस्तीकरिता निधी द्या, अशी मागणी यावेळी सिंदपुरी येथील ग्रामस्थांनी केली. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांनी दुपारी सिंदपुरीला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. (तालुका प्रतिनिधी)