सात महिन्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: August 8, 2015 00:44 IST2015-08-08T00:44:15+5:302015-08-08T00:44:15+5:30
मागील सात महिन्यात वीज कोसळून चार व्यक्तींचा तर ४२ जनावरांचा मृत्यू झाला.

सात महिन्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू
४२ जनावरे मृत्युमुखी : २७० घरांचे नुकसान
भंडारा : मागील सात महिन्यात वीज कोसळून चार व्यक्तींचा तर ४२ जनावरांचा मृत्यू झाला. दरम्यान २७० घरांचे नुकसान झाले. पाऊस, गारपीट, वज्राघात यामुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना व त्यांच्या नातेवाईकांना २५ लाख २२ हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले.
उन्हाळयात गारपिटीमुळे अनेक लोकांच्या घराचे नुकसान झाले. पावसाळयात वीज कोसळून चार लोकांचा मुत्यू झाला. १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यात भंडारा तालुक्यात ३२, मोहाडी तालुक्यात १००, पवनी तालुक्यात सात, साकोली तालुक्यात ४५, लाखनी तालुक्यात ६९, लाखांदूर तालुक्यात पाच असे २५८ घरांचे अशंत: नुकसान झाले.
भंडारा जिल्ह्यात १२ घरे पूर्णत: पडलेले आहेत. यात भंडारा तालुक्यात चार, मोहाडी तालुक्यात सात तर लाखनी तालुक्यात एका घराचा समावेश आहे. घरांचे नुकसान झालेल्या २७० घरांसाठी चार लाख ९ हजार ९०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.
वीज पडून आतापर्यंत चार व्यक्तींचा मृत्यू झाला असून तीन व्यक्ती जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मोहाडी तालुक्यात एक, साकोली तालुक्यात एक आणि लाखांदूर येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली असून जखमींना २१ हजार ३०० रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे.
पाऊस, गारपिट आणि वीज पडून जनावरेसुध्दा मुत्युमुखी पडली आहेत. जिल्ह्यात २४ लहान तर १८ मोठ्या जनावरांचा मुत्यू झाला असून त्यापैकी १९ पशुपालकांना चार लाख ९१ हजार २०० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात पाच पशुपालकांना एक लाख ९१ ४०० रुपये, मोहाडी तालुक्यात सात पशुपालकांना एक लाख ९० हजार, पवनी तालुक्यात चार पशुपालकांना २४ हजार ८००, लाखनी तालुक्यात एका पशुपालकाला ३० हजार, लाखांदूर तालुक्यात दोन पशुपालकांना ५५ हजार रुपये असे एकूण ४ लाख ९१ हजार २०० रुपयांचे अनुदान त्या-त्या तहसील कार्यालयातून देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)