चार दिवसानंतरही आढळला नाही मृतदेह
By Admin | Updated: September 17, 2016 00:52 IST2016-09-17T00:52:59+5:302016-09-17T00:52:59+5:30
कान्हळगाव (मुंढरी) येथील शेतकरी ईस्तारी साधु शेंडे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान

चार दिवसानंतरही आढळला नाही मृतदेह
प्रकरण कान्हळगावातील : आपातकालीन यंत्रणेची मोहीम थंडबस्त्यात
करडी (पालोरा) : कान्हळगाव (मुंढरी) येथील शेतकरी ईस्तारी साधु शेंडे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान गावाकडे पतर येतअसतांना वैनगंगेला अचानक आलेल्या पुरात वाहून गेला. घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटूनही त्यांचा मृतदेह अजुनही तपास यंत्रणेला आढळला नाही. दुसरीकडे आपातकालीन यंत्रणेची शोध थंड पडल्याचा आरोप उपसरपंच दिगांबर कुकडे यांचा असून गावात आक्रोश व्यक्त होत आहे.
कान्हळगाव येथील इस्तारी पुरात वाहून गेल्याची माहिती होताच करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी गावात भेट घेवून तत्काळ मदतीचे आश्वासन दिले होते. शोध मोहिमेसाठी दोन डोंगे व भंडारा येथून एक विशेष बोट बोलविण्यात आली होती. दोन दिवसांपर्यंत कसून शोध घेण्यात आला. भंडारा तालुक्यातील खमारी, भंडारा पर्यंत चमू पोहचली. मात्र, मृतदेह आढळला नसल्याने निराशा पदरी पडली. त्यानंतर मात्र प्रशासनाने मृतदेह फुलल्यानंतर वर येईपर्यंत वाट पाहण्याचे धोरण स्विकारले.
शोध मोहिम थंडबस्त्यात ठेवण्यात आली. ती आजही कायम आहे. आपातकालीन यंत्रणेच्या लापरवाहीमुळेच मृतदेह आढळला नसल्याची ओरड कान्हळगाव वासीयातून व्यक्त होत आहे. प्रशासन यासाठी दोषी असल्याचा आरोप उपसरपंच दिगांबर कुकडे यांनी केला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी शेंडे कुटूंबियाची भेट घेवून धिर दिला. मदतीचे आश्वासन दिले. पंरतू मृतदेह सापडला नसल्याने पुढे मिळणारी मदत होणार नाही, कुटूंबाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मृतदेहाचा शोध घेण्याची मागणी कुटूंबीयांनी केली आहे. एका हाडामासाच्या माणसाचा जीव जातो, अन् प्रशासन गंभीर नाही का? असा सवाल एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांना विचारल्यास कदाचित त्यांचे रक्त खवळेलही, परंतु ज्या रक्तातील नातेवाईकांचा घरच्या माणसावर नैसर्गिक आपदा आली त्यांची मनस्थिती काय असेल, याचा विचार करणे गरजचे आहे. (वार्ताहर)