जिल्हाभरात १९२ शाळाबाह्य मुले आढळले
By Admin | Updated: July 12, 2015 00:47 IST2015-07-12T00:47:02+5:302015-07-12T00:47:02+5:30
६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण आज, जिल्ह्यात करण्यात आले.

जिल्हाभरात १९२ शाळाबाह्य मुले आढळले
सार्वत्रिक सर्वेक्षण : सर्वाधिक साकोलीत ५२ तर सर्वात कमी लाखांदुरात ९ मुलांचा समावेश
भंडारा : ६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण आज, जिल्ह्यात करण्यात आले. सकाळी ७ वाजतापासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. प्रत्येक घरी प्रगणकाने भेट देवून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. जिल्ह्यात एकूण १९२ शाळाबाह्य मुले आढळून आली. यात यामध्ये तुमसर येथे ४९, मोहाडीत ३१, लाखनी ३५, साकोली ५२, पवनी १२ तर लाखांदूरात ९ शाळाबाह्य मुलांचा समावेश आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत सर्व मुलांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहिम हाती घेतली. संपूर्ण राज्यात ४ जुलै रोजी हे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक मतदान व मतमोजणी असल्याने हे सर्वेक्षण आज शनिवारी करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी २ हजार ८०८ शिक्षकांनी प्रत्येक घरी भेट देवून शाळाबाह्य मुलांची माहिती घेतली. त्याचबरोबर रेल्वेस्टेशन, बसस्थानक, विटभट्टया, मोठी बांधकामे, बाजार, पानटपरी व चहाची दुकाने, छोटे-मोठे व्यावसायीक, हॉटेल, अशा सार्वजनिक ठिकाणी सुध्दा भेट देवून शाळाबाहय मुलांचा शोध घेतला.
याशिवाय गुरुव्दारा, चर्च, मंदीर आणि मदरसे इत्यादी ठिकाणी सुध्दा सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सापडलेल्या शाळाबाह्य मुलांच्या हातावर शाई लावण्यात आली. तसेच जवळच्याच शाळेत मुलांना प्रवेश देण्यासाठी पालकांना व शाळांना सूचनाही देण्यात आल्या.
लाखांदूर, मोहाडी, भंडारा, साकोली, पवनी, तुमसर, लाखनी या सर्व तहसिलदारांनी त्या-त्या क्षेत्रात भेट देवून सर्वेक्षण व्यवस्थित सुरु असल्याची खात्री केली. त्याचबरोबर नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी गोविंद जोशी, विजया बनकर, शिल्पा सोनाले यांनी अकस्मात भेट देवून सर्वेक्षणाची मोहिती घेतली. या सर्वेक्षणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील खापा येथे ११ तर तुमसर मदरसा शाळेत ४२ शाळाबाह्य मुले आढळलेत. मोहाडी तालुक्यात सनफ्लॅग कंपनी मध्ये १ तर वरठी येथील मदरसा शाळेत ११ शाळाबाहय मुले, साकोलीमध्ये ३७ शाळाबाह्य मुले आढळून आले. या सर्वेक्षणातील आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलांचा एकत्रित अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)