माजी आमदाराची अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: October 18, 2015 00:09 IST2015-10-18T00:09:51+5:302015-10-18T00:09:51+5:30
जिल्ह्यातील एका माजी आमदाराने साकोली येथील एका उपविभागीय अभियंत्याला माझ्या कामाचे देयके काढून का देत नाही.

माजी आमदाराची अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी
प्रकरण बोगस देयकाचे : मुंबईच्या चौकशी पथकाकडून कामाची पाहणी
भंडारा/साकोली : जिल्ह्यातील एका माजी आमदाराने साकोली येथील एका उपविभागीय अभियंत्याला माझ्या कामाचे देयके काढून का देत नाही. या कारणावरून भंडारा विश्रामगृहात अश्लील शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार संबंधित उपविभागीय अभियंता अद्याप पोलिसात दिलेली नसली तरी या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी अनेक अनागोंदी कामे झाली होती. त्याची चौकशी करण्यासाठी ही चमू आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. आठ वर्षापूर्वी एका आमदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत रस्त्याची कामे केली. रस्त्याची कामे न करताच सदर रस्त्याच्या बिलाची मागणी करण्यात आली असा आरोप त्यावेळी झाला होता. त्यामुळे ही देयके कार्यालयात प्रलंबित आहेत. या विभागामार्फत आठ वर्षापूर्वी याच विभागातील एका शाखा अभियंत्याने कोट्यवधीचा गैरव्यवहार केला होता व हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई येथील अधिकाऱ्यांची चौकशी समिती शनिवारला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या प्रकरणात एका माजी आमदाराने केलेली कामे ही बोगस असून या रस्त्याची कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे या कामाची व या कामाच्या टाकण्यात आलेल्या बिलाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार विद्यमान आमदाराने सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडे केली. या तक्रारीची दखल घेत या रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी बांधकाम विभागाने सचिव स्तरावरचे मुंबईहून पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या चमूला भंडारा येथे पाठविले. ही चमू आज चौकशीसाठी येणार असल्यामुळे कार्यकारी अभियंता आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी, पवनी आणि भंडारा येथील चे उपविभागीय अभियंता हे सकाळीच विश्रामगृहाता दाखल झाले होते. या चमूची वाट बघत असलेले अधिकारी या चमूची वाट पाहत उभे असताना एक माजी आमदार पाचसहा जणांना घेऊन ताफ्यासह पोहोचले. तिथे त्यांनी साकोलीचे उपविभागीय अभियंता यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या कामाचे बिल का काढत नाही. अशी धमकी देऊन ते निघून गेले. हा सर्व प्रकार या अभियंत्यांनी मुंबईहून आलेल्या चौकशी समितीला सांगितला. त्यानंतर हे सर्व अधिकारी कामाच्या चौकशीसाठी निघून गेले.
यासंदर्भात संबंधित उपविभागीय अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला असता त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर घडलेला सर्व प्रकार सांगितला. आज शनिवारला सायंकाळी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
माजी आमदाराने विद्यमान आमदाराला कंत्राटदार असतानाही निवडणूक लढविल्याच्या कारणावरुन न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याचा मानसिक त्रास सहन करणाऱ्या विद्यमान आमदाराने आता माजी आमदाराने पद असताना केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली, त्यानुसार मुंबईहून ही चमू भंडाऱ्यात आली होती. (स्थानिक प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)