माजी नगराध्यक्ष बावनकरांना अटक व सुटका

By Admin | Updated: September 1, 2015 00:24 IST2015-09-01T00:24:38+5:302015-09-01T00:24:38+5:30

अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरुन झालेल्या वादात माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक किशोर उपरिकर यांना मारहाण केली होती.

Former mayor of the city, arrested and rescued | माजी नगराध्यक्ष बावनकरांना अटक व सुटका

माजी नगराध्यक्ष बावनकरांना अटक व सुटका

प्रकरण कर्मचाऱ्याला मारहाणीचे : जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षक वादानंतर सुरू झाले अटकेचे सत्र
भंडारा : अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरुन झालेल्या वादात माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक किशोर उपरिकर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी भगवान बावनकर यांना सोमवारला अटक केली. दरम्यान दुपारी ३ वाजता भंडारा न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
दि.२१ आॅगस्टला संताजी वॉर्डातील नगर पालिकेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी भगवान बावनकर यांना अटक करावी, अशी मागणी करुन पलिकेच्या कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले होते. पालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक असलेल्या उपरिकर यांची दि.१९ आॅगस्टपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत ड्युटी लावण्यात आली होती. त्याअनुषंगाने (२० आॅगस्टला) सहकार नगरातील बागडे यांच्या घरासमोरील अतिक्रमण काढत असताना वाद झाला. यावर उपरिकर यांनी नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
नगराध्यक्षांच्या सुचनेनुसार सदर कर्मचारी माघारी परतले. यावेळी नगर पालिकेच्या कार्यालयात उपरिकर पोहोचताच माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी त्यांना शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाणीचा प्रकार घडला. यासंदर्भात भंडारा शहर पोलिसांनी किशोर उपरिकर, भगवान बावनकर व बागडे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून परस्परांविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते.
तेव्हापासून बावनकर यांना अटक करण्याची मागणी सुरू होती. याप्रकरणी उपरिकर यांनी विनयभंग केल्याची पोलिसात तक्रार असून त्यांनाही अटक करण्याची मागणी विरूद्ध गटाकडून करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी)

पोलिसांची शोधमोहीम
भंडारात पालिका कर्मचाऱ्याला मारहाण आणि पवनीत तहसील कार्यालयात धिंगाणा घातल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयात घेऊन गेले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी अधिकारी व कर्मचारी संघटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तक्रार करूनही कारवाई होत नाही, असा कर्मचाऱ्यांचा आरोप होता. या वादानंतर जिल्ह्यात पोलिसांकडून अटकेचे सत्र सुरु करण्यात आले आहे.

मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष बावनकर यांना अटक करण्यात आली. त्यांना भंडारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
- हेमंत चांदेवार,
पोलीस निरीक्षक भंडारा.

Web Title: Former mayor of the city, arrested and rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.