धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करा
By Admin | Updated: September 24, 2015 00:43 IST2015-09-24T00:43:29+5:302015-09-24T00:43:29+5:30
सततची नापीकी व कर्जाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,...

धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करा
साकोली : सततची नापीकी व कर्जाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सानगडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा वासनिक यांनी केली आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद होत असल्याने शेतातून उत्पादन कसे काढायचे व वितभर पोटाची खळगी कशी भरावी असा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर एक पर्यायी व्यवस्था म्हणून शेतविहीर, शेततळे यासारख्या जलस्त्रोतांची निर्मिती सरकारमार्फत करण्यात आली असली तरी काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची वाट न पाहता स्वत:च जलस्त्रोताची व्यवस्था केली.
काही शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी वीज पंपाची जोडणी प्रलंबित आहे. वीज भारनियमनाच्या फटक्यामुळे सिंचन करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने याचा परिणाम पीक उत्पन्नावर होत असून विजमार नियमाचा फटका असतानाही वीज बिल मात्र जास्त येत असल्याची धान उत्पादक शेतकऱ्याची ओरड आहे.
वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून धान उत्पादक शेतकरी उसणे उधार करून प्रथम कृषी पंप वीज बिलाचा भरणा करीत असतात. तरीपण नियमित वीजपुरवठा केला जात नाही. काही शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे कृषी वीज बिलाचा भरणा करू शकत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतावरील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत असून शेतमालाला कमी हमी भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले शेतकरी कृषी पंप वीज बिलाचा भरणा करू शकत नाही, अशी गंभीर व हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)