जंगलात वणवा अन् अधिकाऱ्यांची वानवा!
By Admin | Updated: March 22, 2017 00:29 IST2017-03-22T00:29:55+5:302017-03-22T00:29:55+5:30
तुमसर तालुक्यातील लेंडेझरीसह तुमसर वनपरिक्षेत्रात वनवणवे (आग) मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

जंगलात वणवा अन् अधिकाऱ्यांची वानवा!
लेंडेझरी येथे जंगलात आगीचे सत्र : पाणवठ्यांना मंजुरीची प्रतीक्षा, नैसर्गिक पाणवठ्यांवर वन्यप्राणी निर्भर
मोहन भोयर तुमसर
तुमसर तालुक्यातील लेंडेझरीसह तुमसर वनपरिक्षेत्रात वनवणवे (आग) मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यापासून जंगलाचे अस्तित्व धोक्यात असून वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. कर्तव्य जंगलात वास्तव शहरात सुरु असल्याने जंगल, वन्यप्राणी कसे सुरक्षित राहणार हा मुख्य प्रश्न आहे. पाणवठ्यांना येथे मंजूरी मिळाली नाही. केवळ नैसर्गिक पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची तृष्णा भागणार काय? हा संशोधनाचा विषय आहे.
तुमसर तालुक्यात तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी तीन वनपरिक्षेत्र आहे. सुमारे ४५ कि.मी. परिसरात हे जंगल आहे. लेंडेझरी जंगल राखीव व संरक्षित क्षेत्रात येते. लेंडेझरी जंगलात ठिकठिकाणी सध्या वणवे सुरु आहेत. अक्षरश: जंगल जळत असल्याचे चित्र आहे. मोठे झाडे येथे आहेत. तेंदूपत्ता संकलन करणारे आगी लावतात असे कारण पुढे केले जाते. याकरिता वनविभागाचे फिरते पथक निश्चितच आहे. हे पथक नेमके करते काय? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्य शासनाने एक वाहन दिले आहे. हे वाहन दररोज तुमसर शहरात फिरताना सर्रास दिसते. अधिकाऱ्यांच्या दिमतीला ही वाहन आहे काय? असा प्रश्न येथे पडला आहे.
लेंडेझरी वनपरिक्षेत्रानंतर पलिकडे नागपूर जिल्ह्याच्या व मध्यप्रदेशाच्या सीमा सुरु होतात. उन्हाळ्यात नेमके शिकारी टोळी येथे सक्रीय होतात. रस्त्याच्या शेजारीच येथे जंगलात आग लागल्याच्या घटन ेत वाढ होत आहे. उन्हाळ्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २४ तास लक्ष ठेवून मुख्यालयी राहण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु येथे त्याचा प्रभाव पडला नाही असे दिसून येते. नुकतीच जंगलात व वास्तव्य शहरात अशी स्थिती आहे. परंतु वरिष्ठ अधिकारीही येथे लक्ष देत नाही. कर्मचारी व अधिकाऱ्यांना राहण्यासाठी मुख्यालयी सदनिका नाहीत. कर्मचाऱ्यांनी राहावे कुठे असा प्रश्न निश्चितच आहे.
पाणवठे नाहीत
वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता नैसर्गिक तथा कृत्रिम पाणवठे असले पाहिजे. तुमसर तालुक्यात नैसर्गिक पाणवठे असल्याचे दाखवून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले नाही. तुमसर वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठे एक ही नाही. नाकाडोंगरी येथे दोन कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मंजूरी नुकतीच मिळाली आहे. तर लेंडेझरी येथेही कृत्रिम पाणवठे नाहीत. अशी माहिती आहे. लेंडेझरी येथील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पाणवठे तयार करण्याकरिता निधी प्राप्त झाला नाही. प्रस्ताव सादर केला आहे. नाला पुनर्जीवनाची कामे केली आहेत. पाणवठे तयार करण्याकरिता मंजुरी मिळाली नाही.
-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात दोन कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मंजुरी प्राप्त झाली आहे. कारली व पवनारखारी येथे तयार होणार आहेत.
-एम.एन. माकडे, वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी.