खडकाळ जमिनीवर फुलले १७ हजार वृक्षांचे वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:12 IST2019-02-02T23:12:35+5:302019-02-02T23:12:49+5:30
जेथे गवतही उगवू शकत नाही अशा खडकाळ आणि ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविले, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र तुमसर वनविभागाच्या कामगिरीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर तुम्हाला मोहगाव (करडी) येथे जावे लागेल. सध्या या ठिकाणी १७ हजार ७७६ झाडे आठ मीटर पर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे.

खडकाळ जमिनीवर फुलले १७ हजार वृक्षांचे वन
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जेथे गवतही उगवू शकत नाही अशा खडकाळ आणि ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविले, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र तुमसर वनविभागाच्या कामगिरीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर तुम्हाला मोहगाव (करडी) येथे जावे लागेल. सध्या या ठिकाणी १७ हजार ७७६ झाडे आठ मीटर पर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे.
मोहगाव करडी येथे १५ हेक्टर वनक्षेत्र खडकाळ व ओसाड होते. कोणत्याही प्रकारचे खुरटे गवत वा रोपटे तिथे जगू शकत नव्हते. संपूर्ण भाग मुरमाने व्यापलेला होता. अनेक वर्षापासून जमीन पडीक असल्याने शेती करायचेही धाडस करत नव्हते. पाण्याचा अभाव आणि मोठ्या प्रमाणात उतार असल्याने पाणीही थेट वाहून जात होते. परंतु अशा खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलविण्याचा निश्चय तुमसर वनविभागाने केला. दोन टप्प्यात १६ हजार हेक्टरवर १७ हजार ७७६ वृक्षांची लागवड वनीकरण विभागाच्या कोम्पा अंतर्गत करण्यात आली. दोन वर्षात या रोपवनाची चांगलीच वाढ झाली आहे. सध्या ही झाडे आठ फुटापर्यंत वाढल्याचे दिसून येते. यासाठी तत्कालीन सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी बाबा चोपकर यांचे परिश्रम कामी आले. वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी, सहाय्यक उपवनसंरक्षक पी.जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात मिश्र रोपवन फुलविण्यात आले. त्यासाठी बीटगार्ड तांदळे, वनकर्मचारी विनायक शेंडे यांनी परिश्रम घेतले. २०१७ मध्ये तीन बाय तीन मीटरवर वृक्षारोपण करण्यात आले. अत्यंत नियोजनबद्धरित्या वृक्षारोपण करण्यात आले.
मोहगाव येथील रोपवनासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड करण्यात आली. वृक्ष जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. त्याचाच परिणाम म्हणून आज खडकाळ जमीन आज हिरवीगार झाली आहे.
-पी.एन. कावळे, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी तुमसर.