रोहयोच्या कामात ‘आधार’ची सक्ती
By Admin | Updated: April 6, 2015 00:45 IST2015-04-06T00:45:54+5:302015-04-06T00:45:54+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

रोहयोच्या कामात ‘आधार’ची सक्ती
शासन निर्णय : १२० दिवस काम उपलब्ध करुन देण्याचा नियम
मोहन भोयर तुमसर
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. अनेकांजवळ आधार कार्ड नाही या मजुरांची मजुरी केवळ राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक तथा स्थानिक पोस्ट आॅफिसमध्ये खाते उघडण्यास शासनानेच बंद घातली आहे. मजुरांना याकरिता शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. १२० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याचे नियम आहे. किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन दिलेच पाहिजे असा कायदा आहे. आदिवासी बहुल गावात १५० दिवस कामे दिली पाहिजे. १ एप्रिलपासून या मजुरांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड नसेल तर मस्टर तयार होणार नाही. याची धास्ती मजूरांनी घेतली आहे. यापूर्वी तालुक्यात शासनाकडून आधार कार्ड तयार करण्याकरिता गावात संबंधित एजेन्सी पाठविली होती. त्यांनी आधार कार्ड काढले, परंतु अनेक मजुरांना आधार कार्ड प्राप्त झाले नाही. त्या एजेन्सीकडे संपर्क साधल्यावर आधार कार्डची स्लिप घेऊन या असे सांगण्यात येत आहे. स्लिप नसेल तर नविन आधार कार्ड काढा असे सांगण्यात येते. मजूरांना यामुळे शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.
रोजगार हमी कामाची मजूरी मजुरांच्या खात्यात जमा होते हे खाते राष्ट्रीयकृत बँकत असणे गरजेचे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा मोठ्या गावात आहे. पोस्ट आॅफिसच्या शाखा गावात आहेत. याचे खाते आता पुढे चालणार नाही असा आदेश मजूरांना देण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खात्याकरिता परिसरातील मोठे गाव तथा शहराशिवाय पर्याय नाही. तिथेही कटकट आहे.
तुमसर तालुक्यात ३ हजार ४०८ कुटुंबांना १०० दिवस कामे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. ३ लाख ७१ हजार २०३ मनुष्य दिवस कामांची योजना ठरविण्यात आली. १९ हजार ९१९ कुटुंबांनी कामाची मागणी केली होती. त्यापैकी १७ हजार ११ हजार कुटुंबांना कामे उपलब्ध करुन देण्यात आली. एकूण ९ लाख ४१ हजार ४०२ मनुष्य दिवस कामे पुरविण्यात आली. आधार कार्ड व खात्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांना विचारणा केली असता मी एका बैठकीत आहे नंतर माहिती देतो असे सांगितले.
रोजगार हमीची कामे आॅनलाईन झाली असून मजुरांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याचा नियम शासनाकडून झाला आहे. स्थानिक बँक तथा पोस्ट आॅफिस आॅनलाईन नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे.
- पी. बी. मोरे,
कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी, तुमसर