पोषण आहार योजनेत निकृष्ट धान्याचा पुरवठा
By Admin | Updated: February 6, 2016 00:35 IST2016-02-06T00:35:11+5:302016-02-06T00:35:11+5:30
वर्ग १ ते ८ मध्ये शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून मागील अनेक वर्षापासून पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे.

पोषण आहार योजनेत निकृष्ट धान्याचा पुरवठा
शिक्षकानेच केला आरोप : शिक्षण विभागाकडे तक्रार नाही
लाखांदूर : वर्ग १ ते ८ मध्ये शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून मागील अनेक वर्षापासून पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. सदर पुरवठयाअंतर्गत अन्न धान्य व कडधान्य निकृष्ट पुरविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी यापुर्वी पालकांसह जनतेतून झाल्याचे ऐकीवात आहे. मात्र खुद्द शिक्षकानेच शापोआ अंतर्गत निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप प्रसार माध्यमापुढे बोलून दाखविला.
शिक्षकानेच शिक्षण विभागासह शासनाची लक्तरे वेशीवर टांगल्याची एकच ओरड आहे. डी.डी. गजभिये मडेघाट असे आरोपकर्ता शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक गजभिये मागील काही वर्षापासून मडेघाट येथील जि.प. च्या शाळेत कार्यरत आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत पुरवठयादाखल धान्याची उचल करणाऱ्या खुद्द शिक्षकानेच या योजनेला गालबोट लावल्याने संबंध शिक्षण विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
वखार महामंडळाच्या कंत्राटदाराकरवी संबंध तालुक्यात धान्य पुरवठा होत असतांना धान्याची गुणवत्ता व मोजमाप होण्याहेतु पुरवठाकर्त्या कंत्राटदाराकडे मोजमाप यंत्र देखील उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.
मागील काही महिन्यापासून मडेघाट येथील शाळेला निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याची माहिती आरोपकर्त्या शिक्षकाने देतानाच शालेय विद्यार्थ्यांना संबंधित निकृष्ठ धान्याचाच आहार शालेय विद्यार्थ्यांना वितरीत केल्याची माहिती आहे. धान्याची उचल करताना धान्य तपासणी व मोजमाप करण्याची सुविधा शासनाने पुरवठा दारांकडे उपलब्ध केली असताना ही बाब शिक्षकाला न कळणे संशयास्पद ठरले आहे. शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ठ धान्याचा पुरवठा होत असल्याची जाणीव या शिक्षकाला असतांना देखील संबंधित धान्य शिजवुन विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप होणे योग्य आहे काय? असा सवाल अनेकांनी केला आहे.
शासनांतर्गत मागील अनेक वर्षांपासून वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शापोआचे वितरण होतांना निकृष्ठ धान्य उचल प्रकरणी संबंधीत शिक्षकाने तपासणी न करता आरोप केल्याचीही चर्चा होत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)