खाद्यान्नातील भेसळ आरोग्यासाठी हानीकारक
By Admin | Updated: April 28, 2016 00:29 IST2016-04-28T00:29:54+5:302016-04-28T00:29:54+5:30
सध्या लगीन घाई सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते.

खाद्यान्नातील भेसळ आरोग्यासाठी हानीकारक
अन्न-प्रशासनाची डोळेझाक : तेलातून होतेय भेसळ
भंडारा : सध्या लगीन घाई सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते. या दिवसांत भेसळीला उधाण येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून अन्न भेसळ विभागाचे अधिकारीसुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाहारगृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असला तरी याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.
ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू असून अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे. काहींनी आता गोठणारे पामोलीयन तेल तूर्तास भेसळ करणे थांबविल्याचे सुध्दा सांगितले जाते.
तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, एवढेच नव्हेतर गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ सुरू आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीकरिता दिसायला लागला आहे. भेसळ करणारे कोट्यधीश झाले तर गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र अन्न , भेसळ विभागाचे अधिकारीच मूग गिळून बसले आहे. एखाद्या दुकानात धाड टाकलीच तर शुध्द आणि नामांकित कंपनीच्या पुड्यातील तेल किंवा अन्नपदार्थ नमुनादाखल घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले जात आहे. यामळे हे नमुने कधी बदलले याबाबत ग्राहकांच्या लक्षात येतच नाही.
केवळ खिसेभरू धोरण असल्याने गोरगरीबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे गरिबांच्या पैशातून वेतन घेणाऱ्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना कोण आवळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना या अन्नभेसळीमुळे आजाराला आमंत्रण द्यावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
उपहारगृहात नियमांना तिलांजली
शहरासह जिल्ह्यातील उपहारगृहामध्ये हजारो ग्राहक नास्ता, जेवण घेतात. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कामावरील मानसांचे आरोग्य तपासणी केल्या जात नाही. तर नियमांना तिलांजली देऊन उपाहारगृहाचे सर्रास व्यवसाय सुरुआहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष आहे.
अन्न भेसळीकडे लक्ष देणार काय ?
जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करुन ग्राहकांची लूट होत असताना उघड्या डोळयांनी पाहणारे अधिकारी याकडे लक्ष देतील की, वेळ मारुन नेईल, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होऊ लागली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ गरिबांच्या माथी मारून अनेकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. वारंवार चर्चा असतांना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचेही आता सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जाऊ लागले आहे.