कोरोना संक्रमण प्रतिबंधासाठी शासन निर्देशांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST2021-02-24T04:36:13+5:302021-02-24T04:36:13+5:30
लाखांदूर : राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे रुग्ण आढळून आल्याने पुढील काळात कोरोना ...

कोरोना संक्रमण प्रतिबंधासाठी शासन निर्देशांचे पालन करा
लाखांदूर : राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे रुग्ण आढळून आल्याने पुढील काळात कोरोना आजाराची दुसरी लाट येऊन कडक लॉकडाऊन करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेने कोरोना आजाराविषयी सतर्कता दाखवून या आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रत्येकाने शासन निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी केले आहे.
ते म्हणाले, “राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत असल्याचे आढळून येत असल्याने राज्य शासनाने नुकतेच या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासनाला दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाईचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार तालुक्यातील मंगल कार्यालयांत यापुढे लग्न अथवा अन्य समारंभ आयोजित करताना ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. तसे न झाल्यास शासन निर्देशानुसार संबंधित मंगल कार्यालय चालकाविरोधात दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याचे शासन निर्देश आहेत.
खाजगी शिकवणी वर्गातदेखील प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क अनिवार्य असून त्यामध्येदेखील शासन निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित शिकवणी वर्ग सील करून बंद पाडण्यात येणार आहे. एवढेच नव्हेतर, सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात तालुक्यातील सर्वांनीच तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असून विशेषत: तालुक्यातील सर्वच वाहन चालकांनी तोंडाला मास्क लावूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तथापि या निर्देशांचे कोणी पालन न करता उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरोधात दंडासह फौजदारी कारवाईचे निर्देश शासनाने निर्गमित केले असल्याचेदेखील सांगितले.
एकंदरीत तालुक्यातील सर्व जनतेने व नागरिक, विद्यार्थ्यांनी या आजाराच्या प्रतिबंधासाठी व लॉकडाऊनपासून बचावासाठी गतवर्षीप्रमाणे आतादेखील शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून दंडात्मक व पोलीस कारवाईपासून बचाव करण्याचे आवाहन ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी केले आहे.