फुले दाम्पत्याचे कर्तृत्व प्रेरणादायी
By Admin | Updated: December 14, 2015 00:40 IST2015-12-14T00:40:45+5:302015-12-14T00:40:45+5:30
शिक्षणाचे आद्यगुरु महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. ....

फुले दाम्पत्याचे कर्तृत्व प्रेरणादायी
नाना पटोले यांचे प्रतिपादन : माळी समाज वधूवर परिचय मेळावा
भंडारा : शिक्षणाचे आद्यगुरु महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. फुले दाम्पत्याचे कर्तृत्व हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले बहुउद्देशिय मित्र मंडळ भंडाराच्या वतीने आयोजित माळी समाज वधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी ते बोलत होते. शनिवारला पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. डी. चिचमलकर, उद्घाटक म्हणून केशवराव निर्वाण हे होते. यावेळी नगराध्यक्ष बाबुराव बागडे, खासदार नाना पटोले, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, अरुण रंधे, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर, डॉ. श्रीकांत भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले यांनी समाजातील नागरिक लग्न, बारसे व तेरवी इथपर्यंत संबंध ठेवतात. मात्र समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. इंग्रज काळात महात्मा फुलेंनी मोफत शिक्षणासंबंधी मागणी रेटून धरली होती. सध्या शिक्षणाचा बाजारीकरण सुरु असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली मिळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण होतो व यातून आर्थिक खर्चाची बचत होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
आमदार अवसरे यांनी माळी समाजबांधवात शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. महात्मा फुलेंनी दिलेले मूलमंत्र शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने जागृत होण्याची गरज प्रतिपादन केले. मंजूषा ठवकर यांनी समाजातील मुलामुलींनी स्पर्धात्मक परीक्षेतून यश संपादन करुन स्वत:चा विकास साधण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी रांगोळी व भावगीत स्पर्धा घेण्यात आली.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कविता राऊत, द्वितीय ऋतुजा कांबळे तर तृतीय विशाखा गाणार यांना देण्यात आले. तर भावगीत स्पर्धेत प्रथम मालती राऊत, द्वितीय रक्षा पवनकर तर तृतीय हिमांशू भूते यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
वधू-वर परिचय मेळाव्यात २५० युवक युवतीनी नावे नोंदवून सहभाग घेतला.
संचालन जयश्री सातोकर, प्रास्ताविक अशोक बनकर तर आभार रमेश गोटेफोडे यांनी मानले. संजय बनकर, रमेश बनकर, ईश्वर निकुळे, रामरतन मोहुर्ले, नरेंद्र पवनकर, संगिता बनकर, माधुरी देशकर, वृंदा गायधने, सुशीला निर्वाण, योगेश्वरी उमप, अनिल नंदूरकर, दिनेश देशकर यांच्यासह माळी समाज बांधवानी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)