पूर आले अन् गेले पण समस्या कायमच!

By Admin | Updated: August 18, 2015 00:38 IST2015-08-18T00:38:25+5:302015-08-18T00:38:25+5:30

तीन दशकापूर्वी मोहाडी तालुक्यात पुल व रस्त्याच्या गरजा जनतेच्या संघर्षातून पूर्ण झाल्या.

Floods have gone but the problem is always! | पूर आले अन् गेले पण समस्या कायमच!

पूर आले अन् गेले पण समस्या कायमच!

पूल व रस्त्यांची दैनावस्था : ३० वर्षापूर्वीच्या रस्त्यावर रहदारी
राजू बांते मोहाडी
तीन दशकापूर्वी मोहाडी तालुक्यात पुल व रस्त्याच्या गरजा जनतेच्या संघर्षातून पूर्ण झाल्या. तीन दशकानंतर झालेली स्थितंतरे बघता पुलांची दशा अन् रस्त्याची जीवघेणी अवस्था कायमच असल्याचे चित्र आजघडीला दिसून येत आहे.
३० वर्षापूर्वी मोहाडी तालुक्याला जोडणारा महालगाव मोरगाव मधातल्या गायमुख नदीवर जनतेच्या लढ्याने पुल तयार झाला. पश्चिम दिशाकडील अनेक गावे मोहाडीला जोडल्या गेली. त्यानंतर चौंडेश्वरी देवी मंदिराशेजारी असलेल्या त्याच नदीवर पुल तयार करण्यात आले. त्यामुळे मांडेसर, खमारी या भागातील नागरिकांना मोहाडी येथे येण्यास सरळ मार्ग मिळाला. पंधरा वर्षापूर्वी मांडेसर मार्ग, कन्हाळगाव मार्ग याचे खडीकरण नंतर डांबरीकरणही झाले.
मोहाडीला दिवसा व रात्री बेरात्री जाणे येणे नागरिकांना सोयीचे होवू लागले. काळ बदलत गेला. गावात दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या. शेतीउद्योग वाढीला लागली. व्यवसायाकरिता जनता बाहेर पडू लागली. विद्यार्थी बाहेर शिकायला जावू लागले. शेती, दुग्ध व्यवसाय, खासगी व्यवसाय, व्यापार, शिक्षण बदलत गेले. परंतु ३० वर्षापूर्वीच्या तात्पुरती झालेल्या सोयी त्याच आहेत.
मोरगाव महालगावच्या पुलाने कितीतरी पुल बघितले आहेत. चौंडेश्वरी देवी शेजारच्याही पुलाने कितीतरी पुर सहन केले. रपट्यासमान असणारे हे पुल त्या काळी लाभाचे ठरले. पण आज हेच पुल विद्यार्थी, जनतेचे कर्दनकाळ ठरले आहेत. आज गरज आहे मोरगाव - महालगाव, चौंडेश्वरी देवी शेजारील पुलांची उंची वाढविण्याची. कमी पावसातही या दोन्ही पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे मोहाडीच्या पश्चिमेकडील पूर्ण गावाचे व्यवहार बंद पडतात. विद्यार्थी शाळेत मोहाडीला, तुमसरला, भंडारा येथे जात नाही.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाववासी येथील लढावू नेत्यांच्या संघर्षामुळे मोरगाव सूर नदी (नेरीवरचा) पुल तयार झाला. कान्हळगाव, मोहाडी रस्त्याचे तीस दशकापूर्वी खडीकरण कम्युनिष्ट विचारसरणींच्या नेत्यांच्या लढ्यामुळेच झाले. मोरगावच्या पुलाचा वरचा सिमेंटचा काही भाग तीन वर्षापूर्वी वाहून गेला. पण ना नेत्यांचे ना बांधकाम विभागाचे लक्ष आहे.
रोहणा पुलाची उंची वाढविण्याची गरज
शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्याने खडड्यांचा अतिशय त्रास सहन करावा लागतो. जेव्हापासून हे रस्ते डांबरीकरण झाले तेव्हापासून केवळ तात्पुरती मुरम टाकून रस्ते दुरुस्त करण्यात आली. पण खड्डेच एवढे की त्या मुरमाची माती होवून पूर्ववत खड्डे तयार होतात. रोहणा येथील पुलही पावसाळ्यात जीवघेणा ठरणारा आहे. पुलावर पाणी असले तर विद्यार्थी बंधाऱ्यावरून सायकलने येतात. त्यामुळे रोहणा पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे.
पूर गेला की सगळे विसरतात
४पूर, पाणी गेला की सगळे विसरले जाते. त्यानंतर पुलाच्या व रस्त्याच्या समस्या त्याच ठिकाणी राहतात. पुल व रस्त्याच्य दयनीय अवस्थेविषयी प्रशासन व शासनाशी लढायला तयार नाहीत. सामान्य माणसांनी काय करावे? रस्त्याच्या खडड्यातून गाड्या चालवाव्या? लक्ष नसले तर खाली पडावे. रस्त्याचा मार खावा. अन् पावसाळ्यात पुलाच्या वरून पाणी वाहत असेल तर जीव धोक्यात घालून पुलाच्या बाहेर पडावे. अन् जमले नाही तर पुलाच्या खाली यावे. हेच आता सामान्य जनतेच्या हातात राहिले आहे. प्रशासनाने प्रतिक्षा करावी हे दुर्देव सामान्यांच्या नशिबी आले आहे.

Web Title: Floods have gone but the problem is always!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.