उड्डाण क्रीडा महोत्सव
By Admin | Updated: December 28, 2016 02:12 IST2016-12-28T02:12:32+5:302016-12-28T02:12:32+5:30
भंडारा : येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे सामाजिक उत्तरदायित्व विभागामार्फत मॅजीक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने

उड्डाण क्रीडा महोत्सव
भंडारा : येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे सामाजिक उत्तरदायित्व विभागामार्फत मॅजीक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने उड्डाण प्रकल्पाच्या माध्यमातून उड्डाण क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ६५ गावातील ३३ संघांनी सहभाग घेतला असून त्यात मुली, महिला आणि सुमारे ३५० खेळाडूने सहभाग घेतला.
क्रीडामहोत्सवात कबड्डी, थ्रो बॉल व लेग क्रिकेट या खेळांचा सहभाग होता. या क्रीडामहोत्सवाचा उद्देश महिलांच्या क्रीडावृत्तीला चालना देणे, त्यांच्यात संघ कार्याची भावना तयार करणे व त्यांचा गावविकासात सहभाग वाढविणे हा होता. या क्रीडा स्पर्धेत युवतींच्या कबड्डी स्पर्धेत गराडा (खुर्द) येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय माटोरा येथील संघाने पटकाविला. लहान मुलींच्या कबड्डी सामन्यात गराडा (खुर्द) येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय माटोरा येथील संघाने पटकाविला. लेग क्रिकेट च्या सामन्यात इटगाव येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक आमगाव येथील संघाने पटकाविला. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक गुंजेपार येथील संघाने तर द्वितीय क्रमांक गुंथारा येथील संघाने पटकाविला.
उद्घाटन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या हस्ते पार पडले. बक्षिस वितरण भंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ.निरजा सिंग, मॅजिक बसच्या सिनीयर मॅनेजर वैभवी भालेकर उपस्थित होते. संचालन प्रियंका मेश्राम व अनिल कावळे यांनी केले. आभार प्रदर्शन मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विक्की जयश्री प्रेमानंद यांनी केले. (प्रतिनिधी)