प्राण्यांची तृष्णातृप्त करणारी पाणी टाकी जमीनदोस्त
By Admin | Updated: June 13, 2017 00:18 IST2017-06-13T00:18:58+5:302017-06-13T00:18:58+5:30
जंगली प्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात.

प्राण्यांची तृष्णातृप्त करणारी पाणी टाकी जमीनदोस्त
गोबरवाही येथील प्रकार : अतिक्रमण होऊ नये म्हणून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
तुुमसर : जंगली प्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. काही स्वयंसेवी संस्था तथा कार्यकर्ते त्याकरिता पुढाकार घेतात. गोबरवाही परिसरात रेल्वे स्थानकाच्या बाजूला एका इसमाने प्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता लहान टाकी तयार केली होती. अतिक्रमणाच्या नावाखाली नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी ती तोडली.
तुमसर- कटंगी राज्य महामार्गावर गोबरवाही रेल्वे स्थानकासमोर जंगलव्याप्त परिसर आहे. उन्हाळ्यात वन्यप्रण्यांची भटकंती या परिसरात पाहायला मिळते. मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर गोबरवाही परिसरातील एजाजभाई नामक युवकाने वन्यप्राण्यांकरिता सिमेंट काँक्रीटच्या टाकी तयार केली. येथे माकडांसहीत इतर प्राणी तृष्णा भागविण्याकरिता येत होते. त्याच बाजूला दुसरी एक पाण्याची टाकी तिथे पूर्वीपासून होती. वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता दुसरी नवीन टाकी तिथे तयार करण्यात आली.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात सदर परिसर येतो. नवीन टाकी वनकर्मचाऱ्यांनी येवून तोडली. यासंदर्भात अतिक्रमण केल्याबाबत ही कारवाई करण्यात येत असल्याचे एजाजभाई यांना सांगण्यात आले. वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता केवळ पाणी टाकी तयार केली. दुसरीकडे गोबरवाही परिसरातील वनविभागाच्या जागेवर यापूर्वी अतिक्रमण केलेली अनेक घरे आहेत. पाणी टाकीमुळे अतिक्रमण होत आहे काय? असा प्रश्न एजाजभाई यांनी उपस्थित केला आहे. पाणीटाईमुळे अतिक्रमण होते काय? हा संशोधनाचा विषय आहे.
जंगलात कोणतेच बांधकाम करता येत नाही. पाणी टाकीचे बांधकाम कुणाच्या आदेशावरून करण्यात आले. जंगलात सिमेंट बांधकामाला परवानगी नाही. नियमानुसार कारवाई करण्यात आली.
-एम.एन. माकडे,
वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी.