जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहण
By Admin | Updated: May 2, 2015 00:40 IST2015-05-02T00:40:37+5:302015-05-02T00:40:37+5:30
महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहण
भंडारा : महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी ध्वजारोहण करून जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी राजेश पडोळे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस श्वान पथक आणि पोलीस बॅन्ड पथक यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस नाईक विजय वंजारी व ललीत टिकरिया यांनी उत्तम अभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या शिवनी मोगरा व रेंगेपार कोहळी या ग्रामपंचायतींना पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अत्यंत अल्प कालावधीत पवनी नगर परिषद मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची उत्कृष्ट वसुली केल्याबाबत पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देवळीकर यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबाबत लघुलेखक ज्ञानेश्वर तिनखेडे, मंडळ अधिकारी सुरेश खडकसिंगे, शिपाई किशोर वाडीभस्मे, कारधा पोलीस पाटील भाऊराव मडामे, अव्वल कारकुन संजय जांभुळकर, लिपीक टंकलेखक माधुरी मस्के, तलाठी पी. व्ही. अहिर यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
शहरात ८० घरफोडीच्या गुन्ह्यात ८८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १७ लक्ष ६२ हजार रूपयांची मालमत्ता हस्तगत करणाऱ्या गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, सहायक पोलीस निरीक्षक जयंत गादेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गिते, पोलीस नाईक तुलशिराम मोहरकर, प्रशांत गुरव, बबीता चौरे आणि स्रेहल गजभिये यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान उत्कृष्ट व्हिडीओग्राफी करून मोलाची कामगिरी बजावणारे पोलीस शिपाई घनशाम कोडापे तसेच सुनिल सोनवाने व अरुण केसलकर या पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व विभाग प्रमुख, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)